Maharashtra Cabinet Expansion : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने प्रभावी विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही आता पूर्णविराम मिळणार आहे. नागपूर येथे आज मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यात भुसावळच्या शिरपेचात पुन्हा मंत्रिपदाचा तुरा रोवला जाण्याची शक्यता आहे. आमदार संजय सावकारे यांच्या रूपाने भुसावळला पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असून, सावकारे या मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपुरात दाखल होणार आहेत. त्यांना पक्षाकडून फोन आला असून, याबाबत त्यांनीदेखील दुजोरा दिला आहे. मात्र, हा फोन मंत्रिपदासाठी होता की इतर बाबीसाठी हे लवकरच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीचे आमदार असताना, संजय सावकारे यांनी ११ वर्षांपूर्वी कृषी राज्यमंत्रीपदासह जळगाव जिल्हाचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला, यावेळी त्यांनी मंत्री असतानाच राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केला होता.
भाजप पक्षातर्फे संजय सावकारे हे दोन वेळा आमदार राहिले असून, या निवडणूक ते चौथ्यांदा आमदार झाले आहे. त्यामुळे यंदा पक्ष त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्दी बघत त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळत आहे. मात्र, त्यांच्याकडे कोणतं खातं सोपवलं जाईल ? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रीपदांचा फॉर्म्युला
महायुतीने २१ (भाजप), १२ (शिवसेना), आणि १० (राष्ट्रवादी) असा फॉर्म्युला ठरवला आहे.
भाजप गृह, अर्थ, जलसंपदा, ऊर्जा यांसारखी प्रमुख खाती ठेवणार आहे.
शिवसेनेला नगरविकास, शालेय शिक्षण, व उद्योग खाती मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सार्वजनिक बांधकाम, कृषी, व महिला व बालकल्याण खाती मिळू शकतात.
शपथविधी सोहळा
उपराजधानी नागपूर येथे दुपारी ४ वाजता शपथविधी होईल.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहील.
राजकीय परिणाम
या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीतील घटक पक्षांची सामंजस्यता दिसून येईल. जिल्हा आणि राज्य पातळीवर नेत्यांना जबाबदारी दिल्याने आगामी राजकीय समीकरणेही मजबूत होतील.