Maharashtra Government Formation : इतर मंत्र्यांच्या शपथविधीची ठरली तारीख, ‘या’ नेत्याने सांगितला मुहूर्त

मुंबई । राज्यातील सत्तास्थापनेचा पेच दोन आठवड्यांनंतर सुटला असून, भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार ? असा सवाल उपस्थित होत असून, यावर आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. तर, येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच येत्या ११ डिसेंबर रोजी इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना असे म्हटले की, आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पंतप्रधानांचा वेळ कमी मिळाल्याने तिघांचा शपथविधी होईल. कोणाला किती खाती मिळतील चर्चेअंती तिढा सुटेल, असं त्यांनी म्हटलं. तर एकनाथ शिंदेंनी जे मागितलंय त्यावर दुपारपर्यंत निर्णय होईल. भविष्यात काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातील. यावेळी आम्हाला संधी मिळेल. आपले सवंगडी सत्तेत आले तर पक्षाचा फायदा नक्की होईल, असे भरत गोगावले यांनी सांगितले.