Munde-Fadnavis-santosh विराेधकांचा अंदाज साफ चुकला
Munde-Fadnavis-santosh महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पिढी एकेका नेत्याभाेवती फिरत आली. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्याकडे राज्याचे नेते म्हणून महाराष्ट्राने पाहिले. सध्या ही जागा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ते मुख्यमंत्री आहेत म्हणून ते नेते आहेत अशातला भाग नाही. स्वभावात मवाळपणा, कुठेही इगाे नाही, पक्षातल्या सगळ्या गटातटांनाच नव्हे, तर मित्रपक्षांनाही साेबत घेऊन काम करण्याची खुबी. या जाेरावर देवेंद्र फडणवीस आज जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मराठा आरक्षणाच्या आडून फडणवीसांवर दरराेज हल्लाबाेल करणारे मनाेज जरांगे यांचीही थंडावलेली ताेफ बरेच बाेलून जाते. फडणवीस पुन्हा आल्यावर मराठ्यांचे माेर्चे वाढतील, आंदाेलनं भडकतील हा विराेधकांचा अंदाज साफ चुकला; उलट आज कुठल्याही आक्राेशात फडणवीस टार्गेट नाहीत. कुठल्याही मुख्यमंत्र्याला मिळाला नसेल एवढा लाेकाश्रय फडणवीस एन्जाॅय करीत आहेत.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजाेगचे सरपंच संताेष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेला दाेन महिने झाले. या हत्येतील आराेपींना फाशी द्या असा गावकऱ्यांचा आक्राेश आहे. पाेलिसांनी या प्रकरणी काही आराेपींना अटक केली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला पाेलिसांनी मकाेकामध्ये अटक केली आहे. हा कराड राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यावरून राजकारण तापले. मुंडे यांच्या विराेधकांना त्यांचा राजीनामा हवा आहे. मुंडे याला तयार नाहीत. ‘माझा या हत्या प्रकरणाशी संबंधच नाही तर मी राजीनामा का देऊ?’ असा मुंडे यांचा सवाल आहे. पूर्वी साधा आराेप झाला तर राजकारणी राजीनामा देऊन माेकळे व्हायचे. अंतुले, निलंगेकर, आर. आर. पाटील यांची उदाहरणे आहेत. एवढेच काय, सिंचन घाेटाळ्यात आराेप झाले तेव्हा खुद्द अजितदादा यांना राजीनामा द्यावा लागला हाेता. आराेपातून सुटका झाली तेव्हा ते पुन्हा रुजू झाले. पण ते दिवसच वेगळे हाेते. आराेपींना घरी जा म्हणण्याचा अधिकार नेत्यांनी केव्हाच गमावला आहे.
आता या सरपंचाच्या हत्येचा तपास पूर्ण हाेऊन काेर्टाचा निकाल यायला किती काळ लागेल, हे काेणीच सांगू शकत नाही. तिकडे ‘दाेषींना साेडले जाणार नाही’ असे फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि मुंडे ज्या पक्षाचे मंत्री आहेत, त्या पक्षाचे सुप्रीमाे अजित पवार वारंवार सांगताहेत. तरीही बीडची आग विझलेली नाही. भगवानगडाचे बाबा नामदेवशास्त्री यांचा पाठिंबा मिळवून मुंडे यांनी आगीचा भडका अकारण वाढवला. या मामल्याकडे आधीपासून वंजारी विरुद्ध मराठा असे पाहिले जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने बाेलताना काळजी घेणे अपेक्षित आहे. या बाबा लाेकांचेही काही खरे नाही. अजितदादा जे बाेलू शकत नाहीत ते नामदेवशास्त्री बाेलले. त्यांनी मुंडेंना ‘मिस्टर क्लीन’ सर्टीफीकेट देण्याची घाई का केली, हे काेडे आहे. ‘कराडशिवाय धनूभाऊंचं पान हालत नाही’ असं पंकजा मुंडे यांनी मागे म्हटले हाेते. मग आता वाल्मीकिचा ‘वाल्या’ काेणी केला? काेण जबाबदारी घेणार?
दिवंगत भाजपा नेते गाेपीनाथ मुंडे यांच्याकडे घरगडी असलेला वाल्मीक कराड एवढा कसा वाढला? पण तुम्हाला एक सांगू का? ‘वाल्मीक कराड’ केवळ बीडमध्ये नाही. ताे नवनव्या रूपात प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक तालुक्यात आहे, प्रत्येक गावात आहे. राजकारण्यांची ती गरज आहे. बीडमध्ये एका कराडला पाेलिसांनी मकाेका लावला; पण इतर जिल्ह्यातल्या ‘कराडांचे’ काय? बीडचे राजकारण तापले असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दाैèयात कुठला कार्यक्रम ठेवला असेल? कल्पना करा. बीडमध्ये राष्ट्रवादी टार्गेटवर आहे. मुंडे संपले तर मराठवाड्याचे सारे राजकारण भाजपाच्या खिशात येते. मात्र फडणवीसांनी असा विचार केला नाही. त्यांनी दाैऱ्याचा फोकस दुष्काळमुक्तीवर ठेवला. 80 वर्षांत अनेक मुख्यमंत्री हाेऊन गेले. तिघे तर चक्क मराठवाड्याचेच हाेते. काय केले त्यांनी मराठवाड्यासाठी? लाेकांना पिण्याचे साधे पाणी आपण देऊ शकले नाही.
उसाला मात्र पाणी देतात. कारण ऊसवाल्यांची लाॅबी आहे. एका सरपंचाच्या हत्येनंतर तिकडचे बाेगस धंदे उजेडात आले. वाळू माफीया, परळीत औष्णिक प्रकल्प आहे. तिकडची राख कुठे जाते? काेणालाही हा हिशाेब विचारावासा वाटला नाही? मतदान केंद्रांवर रांगा लावून आपण ज्यांना निवडून देताे ते लाेकप्रतिनिधी शेवटी करतात काय? मुंडेंचा लीड तर एक लाखावर मतांचा आहे. बीडमध्ये गुंड टाेळ्यांचे राज्य हाेते, असा साऱ्यांचाच सूर आहे. मग इतकी वर्षे हे लपून कसे राहिले? या घाेटाळ्यांचा ‘आका’ काेण? तिथले लाेक ते बाेलायला पुढे येणार नसतील तर मग परिवर्तनाची अपेक्षा का करावी आणि कशासाठी? ‘दीवार’ सिनेमात एक प्रसिद्ध डायलाॅग आहे. चुकीच्या मार्गाने श्रीमंत झालेला अमिताभ बच्चन हा शशी कपूरला म्हणताे, ‘मेरे पास कार है, बंगला है. तुम्हारे पास क्या है?’ त्यावर शशी कपूर म्हणताे, ‘मेरे पास माँ है.’
हा सिनेमा येऊन कित्येक वर्षे लाेटली. शशी कपूर आज आपल्यात नाहीत, पण त्यांचा ताे डायलाॅग ‘मेरे पास माँ है?’ आजही आठवला जाताे. सारं जाऊ द्या. पण किती मुलं हे म्हणतात, ‘मेरे पास माँ है!’ आजची आई अडगळीतल्या खाेलीत गेली आहे. पण त्या लायनीवर आमदार सुरेश धस यांनी जाहीर सभेत फेकलेला डायलाॅग ‘दिवार’मधल्या शशीलाही मारणारा आहे. बीडच्या सभेत भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले, ‘मेरे पास देवेंद्र फडणवीस का आशीर्वाद है…!’ हे साधे वाक्य नाही. फडणवीस आपल्यासाेबत आहेत हा विश्वास आज काेट्यवधी मराठी माणसाचा प्राणवायू बनला आहे. जिल्ह्यातल्या गुंडांच्या टाेळ्यांचा बंदाेबस्त करा, अशी मागणी या आमदाराने मुख्यमंत्र्यांकडे केली. हे काम पाेलिसांचे आहे. पाेलिस ते करीत नाहीत. त्यामुळे सरकार टार्गेट बनते. पाेलिस गंभीर झाले तर गुन्हा घडूच शकत नाही. पाणी तिथेच मुरते.
हा केवळ बीडचाच नव्हे, तर संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. सरपंचाच्या हत्येनंतर दाेन महिन्यांनी फडणवीस बीडला आले, ताे कार्यक्रमही जलवाहिनी पूजनाचा हाेता. मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असे आश्वासन त्यांनी इथल्या जाहीर सभेत दिले. मात्र, त्यांना सर्वाधिक टाळ्या मिळाल्या त्या गुंडामुक्तीवर. लाेकांना नेमके काय पाहिजे ते यावरून लक्षात येते. ‘गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. काेणी कितीही माेठा असाे, कारवाई करू’ असे सांगून फडणवीसांनी जनतेला आश्वासित केले. दावाेस दाैऱ्यानंतर काही लाख काेटी रुपयांचे उद्याेग राज्यात येऊ घातले आहेत. खंडणीखाेरांना माेकळे रान मिळाले तर काेण इथे पैसे लावेल? कायदा आणि सुव्यवस्था हा आजचा माेठा प्रश्न आहे. ‘हा नाराज-ताे नाराज’ हे राज्याचे प्रश्न हाेऊ शकत नाहीत. लाेकांनी सहकार्य केले तरच शांत आणि प्रगत महाराष्ट्राच्या वाटेवर जाणे शक्य आहे.
फडणवीसांनी नेमके दुखणे हेरले. त्यानुसार कामालाही भिडले आहेत. जगन्नाथाचा हा रथ फडणवीस ओढू शकतात. फडणवीस जे करू शकले ते महाविकास आघाडीमधला कुणी नेता करू शकला नाही. फडणवीस काही वेगळे करतात किंवा त्यांच्याकडे अल्लाउद्दीनचा दिवा आहे अशातला भाग नाही. 24 तास राजकारण करणाऱ्या नेत्याने जे करायला हवे तेच फडणवीस करीत आहेत. राजकारण आता ‘पार्टटाईम’ राहिलेले नाही. तुमचा नेता 24 तास उपलब्ध पाहिजे. नरेंद्र माेदींचे ‘वर्क कल्चर’ फडणवीस पुढे नेत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. फडणवीस ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला का जात नाहीत, याची चिंता संजय राऊतांनी करू नये. मुंबई महापालिकेतले उद्धव सेनेचे ‘शिल्लक दुकान’ गुंडाळल्यानंतर ‘वर्षा’चा मुहूर्त फडणवीस काढतील.