Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच आता हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानाच्या दृष्टीने पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून मुंबईसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १ एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. २ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.
अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठा प्रमाणात बसू शकतो. रब्बी पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आव्हान कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे वाढलेल्या तापमानात घट होण्याचाही अंदाज व्यक्त केला गेला आहे.