Maharashtra Weather Update: राज्यात सध्या संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी अवकाळी पावसाचे संकट राज्यावर निर्माण होत आहे. अशात थंडीचा जोर वाढलेला असताना आज आणि उद्या राज्यातील मध्य-उत्तर महाराष्ट्रासह कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार, आज जळगावातही पावसाची शक्यता आहे तसेच पुढचे चार दिवस परिसरातील किमान तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होण्याची शक्यता देखील हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. तीन सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव आहे. याचा वातवरणावर मोठा परिणाम झाला आहे. देशातील दक्षिणेकडील राज्यात पाऊस तर उत्तरेकडे पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असं संमिश्र हवामानातची स्थिती राहील.
जळगावसह ‘या’ जिल्ह्यात आज पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांमध्ये पुढच्या 48 तासात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, रायगड, पालघरमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढचे 48 तास पावसाची शक्यता आहे. यासह कोकण आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रात चार दिवस ढगाळ वातावरण राहत किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
सध्या जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणचे तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे. त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. अशात संमिश्र वातावरणाचा फटका देखील परिसराला बसत आहे. कधी अवकाळी पावसाचे सावट तर कधी ढगाळ वातावरण अशी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे.