जळगाव : ब्रिटिशकालीन पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधी किमतीच्या जुन्या पाइप चोरीचा कट महापालिकेत सत्तेत असताना शिजला. या कटाला मूर्तस्वरूप देण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठका झाल्या. या बैठकांना रथी-महारथी हजर होते, असा गौप्यस्फोट आमदार सुरेश भोळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर आपण टाकणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेतील पाइप चोरी व भंगार साहित्य विक्रीची व्याप्ती मोठी आहे. या गैरव्यवहारात बडे रथी महारथींचे भ्रमणध्वनीवरून कॉल झाले असून, ते पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा महापालिकेतील पाइप चोरी व भंगार साहित्य विक्रीचा विषय त्यांच्याकडे मांडणार आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने याप्रकरणी सर्वंकष चौकशी करावी. अशी मागणीही आमदार भोळे यांनी केली.
महापालिका पाइप चोरी म्हणजे ही जनतेच्या पैशांची लूट आहे. या गैरप्रकारात महापालिकेतील तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते सूत्रधार सुनील महाजन असल्याचे माध्यमातून कळले, असे सांगून आमदार भोळे म्हणाले की, शासकीय मालमत्तांची चोरी हा प्रकारच चिंताजनक आहे.
पदावर असताना रचला कट
महापौर तसेच विरोधी पक्षनेता पदावर असताना निविदा प्रक्रियेचा कट शिजला. या कटाची सखोल चौकशी झाली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था जनतेच्या पैशांतून चालतात. ही जनतेच्या पैशांची चोरी केली आहे. त्याची भरपाई केली जावी. दोषींच्या मालमत्तांवर बोजा लावावा, अशी मागणी करून आमदार भोळे म्हणाले की, ही चौकशी करताना निर्दोष जे असतील, त्यांच्यावर कारवाई नको. मात्र, जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून याप्रकरणी चौकशी व तपास सुरू आहे. बऱ्याच लोकांचे कॉल या प्रकरणात झाले आहेत. यात बरेच जण लाभार्थी आहेत. कोणाच्या शेतात हे पाइप होते? कोणी भंगार घेतले? किती घेतले? विश्रामगृहात यासंदर्भात झोलेल्या बैठकांमध्ये कोण कोण उपस्थित होते? हे पोलीस तपासात आले आहे, असे सांगून आमदार भोळे यांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू आहे, चौकशीत खरे काय, ते निष्पन्न होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहरासाठी ब्रिटिश काळात गिरणा पंपिंग येथून जुन्या पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा होत होता. हे पाच कोटी रुपयांचे पाइप होते. निविदा काढली फक्त ८० लाखांची. निविदा होती तर मग रात्री पाइप काढले कशासाठी, असा प्रश्नही आमदार भोळे यांनी उपस्थित केला.
पाठीशी घालणारेही लाभार्थीच
पाइप चोरी व भंगार साहित्य विक्रीची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सर्वंकष चौकशी होणे आवश्यक आहे. कारवाईदरम्यान महापालिका किंवा पोलीस प्रशासनात जर कोणी दोषींना पाठीशी घालत असेल, तर त्यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, अशी धारणा बनेल. त्यामुळे त्यांनाही त्यात सहभागी करावे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भात चौकशीची मागणी करणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहील, असेही आमदार भोळे यांनी स्पष्ट केले.