पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष आ. जयंतराव पाटिल, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे झाली.
बैठकीच्या प्रारंभी खा.सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात भरघोस मताधिक्याने विजय झाला त्याबद्दल त्यांचा महिला आघाडीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महिला आघाडीच्या कार्याचा आणि संघटनेचा लेखाजोखा सादर केला. तसेच आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या भगिनींनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन घरोघरी चुलीपर्यंत जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ता भगिनी प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन, पक्षाची ध्येय धोरणे, कार्य, शरद पवार यांचे विचार, कार्य तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतील, असा विश्वास खा सुप्रिया सुळे, आ जयंतराव पाटील यांना रोहिणी खडसे यांनी दिला. त्याला उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी हात उंचावून संमती दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीतसुद्धा सत्ताधारी त्यांचे अपयश लपवण्यासाठी असाच साम – दाम – दंड – भेद नीतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्याला सावधानतेने निडरपणे जनतेत जाऊन आपल्या पक्षाला यश मिळवून द्यायचे आहे. त्यासाठी सर्व महिला पदाधिकारी मेहनत घेतील याची खात्री असल्याचा रोहिणी खडसे यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या भगिनींनी प्रचारात हिरीरीने सहभाग घेऊन उत्कृष्ट कार्य केले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत पक्षाला, महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. या यशात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचासुद्धा सक्रिय सहभाग आहे, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आगामी काळात विधानसभा निवडणुका आहेत त्यादृष्टीने आपल्याला जोमाने कामाला लागावे लागेल. शरद पवार साहेबांनी महिलांना दिलेले आरक्षण, वडिलांच्या संपत्तीत दिलेला वाटा व महिलांच्या हिताचे घेतलेले इतर निर्णय व आपल्या पक्षाची विचारसरणी माता भगिनींपर्यंत पोहचवा, असे खा सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी आशा भिसे, कविता म्हेत्रे, अर्चना घारे, भारती शेवाळे, मृणालिनी वाणी आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.