नंदुरबार : येथील स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारूच्या वाहतूकीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शनिवारी (दि. १४) १९ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
शहादा पोलीस ठाणे हद्दीतून प्रकाशा मार्गे अक्कलकुवा कडे तीन ते चार चारचाकी वाहनांनी अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी प्रकाशा गावातील काथदें फाट्यावर चेकिंग सुरू केले. तेथे तीन ते चार चारचाकी वाहने एकामागोमाग येताना दिसली, पोलीस पथकाने हात व टॉर्च देऊन थांबविले असता वाहन चालकांनी पोलिसांच्या बॅरिगेटला धडक देत वाहनांना जोरात पुढे नेले. या वाहनांनी अक्कलकुवाकडे पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून एक वाहन पकडले आणि चालक ललीतकुमार रामुभाई सुमन (वय 38, रा. उदवाडा, बलसाड, गुजरात) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आरोपींच्या नावांची माहिती दिली. तो माल भरत यादव यांचा असल्याचे सांगितले. वाहन सोडून पळून गेलेल्या इतर चालकांचे नाव कमलेश पटेल आणि मोहसिन पठाण होते.
सदर कारवाईत १९ लाख ८१ हजार रुपये किमतीचे देशी आणि विदेशी दारूचे साठे व वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली.