जळगाव जिल्ह्यात हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस बाहेर पडणेही कठीण होईल इतका उष्मा जाणवत असताना हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १७ ते २० मार्चदरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

१५ मार्चपासून वातावरणात ढगाळपणा वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र याच काळात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे उकाडा अधिक जाणवू शकतो. त्यानंतर १७ मार्चपासून राज्यातील काही भागांसह जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या कालावधीत वादळी वारे आणि गारपीटही होऊ शकते.

२० मार्चनंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून २१ आणि २२ मार्चदरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र २३ मार्चनंतर पुन्हा कोरडे वातावरण तयार होऊन तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना काही काळ उन्हाच्या तडाख्यातून दिलासा मिळू शकतो. परंतु शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. सध्या जिल्ह्यात गहू, हरभरा आणि मका यांसारखी रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर आहेत. अशा वेळी पाऊस किंवा गारपीट झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध करण्याचा सल्ला दिला आहे. काढणी झालेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---