जामनेर : पुढील पाच वर्षांसाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान कर. संपूर्ण बहुमत ४०० पार होऊ दे. देश विश्व गुरु, सुपर पावर होऊ दे अशी प्रार्थना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी केली. मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या पथसंचलनात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सहभाग घेतला होता. तत्पूर्वी श्रीराम पेठ येथे विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या गुढीचे पूजन करून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. पथसंचलनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सर्वांना मराठी नववर्षांच्या शुभेच्छा देऊन नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे साकडे घातले.
ना. महाजन पुढे म्हणाले की, देशाचा विकास गतीनं होत आहे. ५५० वर्षांपासून वनवासात असलेले प्रभू श्रीराम हे मुक्त होऊन आयोध्येत भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. काशी विश्वेश्वर, मथुरा यासह सर्वांचे श्रद्धास्थान हे मोकळे श्वास घ्यायला लागले आहेत. मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकास करत आहे. आमचा नेता जगात लोकप्रिय आहे यानिमित्ताने माझी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना आहे की पुढील ५ वर्ष नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान कर. संपूर्ण स्पष्ट बहुमत ४०० पार होऊ दे. हा देश विश्व गुरु, सुपर पावर होऊ दे. एकनाथ खडसे यांच्या घरवापशी बाबत मला काही कुठलीही माहिती नाही. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की माझा खाली संपर्क नाही माझी वरती हॉटलाईन आहे. त्यांनाच माहिती ते काय करतात. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा साथ सोडवून ते काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या सोबत जाण्याची फार मोठी चूक केली आहे. आयुष्यभर याचे शल्य त्यांना राहणार आहे. जळगाव, रावेर मतदार संघातील दोघे उमेदवार राज्यात विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.