नवी दिल्ली : भारत आणि मालदीव यांच्यातील परस्पर संरक्षण संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी पुनरुच्चार केला. राजनाथसिंह यांनी बुधवारी मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय बैठकीत चर्चा केली.
गेल्या ऑक्टोबरमध्ये मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइइझू यांच्या भेटीचा संदर्भ देत राजनाथसिंह म्हणाले की, त्यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली. मोईझ्झू यांच्या भेटीदरम्यान जारी करण्यात आलेला संयुक्त व्हिजन डॉक्युमेंट दोन्ही देशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये एकूणच सुधारणा होत असताना लष्करी संबंध मजबूत करण्यासाठी मालदीवचे संरक्षण मंत्री मौमून बुधवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. दिल्लीत ते अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत. मालदीवचे चीन समर्थक राष्ट्रपती मोहम्मद मोइइझू यांच्या मागणीनंतर भारताने हिंद महासागर द्वीपसमूहात तैनात केलेल्या सुमारे ८० लष्करी जवानांना परत बोलावले होते. भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये दोन लष्करी सुविधांच्या देखभाल आणि संचालनासाठी होते. त्यांच्या जागी भारतीय नागरी कर्मचारी तैनात करण्यात आले.
या संपूर्ण घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये गंभीर तणाव निर्माण झाला होता. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथसिंह ८ जानेवारी रोजी नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेत आहेत. दोन्ही मंत्री मालदीवची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, सराव आणि समन्वय यावर काम करतील. राष्ट्रीय संरक्षण दल संरक्षण प्रकल्प तसेच संरक्षण उपकरणांच्या पुरवठ्यासह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या ‘शेजारी प्रथम धोरणात मालदीवचे विशेष स्थान आहे. हिंद महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धी आणणे हा या धोरणाचा उद्देश आहे.