चोपडा : तालुक्यातील लासूर येथे क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरातचा महिला जागृती मेळावा नुकताच झाला. यात लग्न समारंभात प्रीवेडिंग शूटिंग करणे बंद करावे, मेहंदी फंक्शन बंद करणे यासह पाच महत्त्वपूर्ण ठराव हात उंच करून महिलांनी एकमताने मंजूर केले.
या वेळी माळी समाजातील विविध चालीरीती, रूढी, परंपरा यावर महिलांनी सखोल अशी चर्चा घडवून आणली. समाजातील अंधश्रद्धा कशी दूर करता येईल यासाठीही प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
मेळाव्याला मार्गदर्शन करताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवानिवृत्त प्रा. मुक्ता माळी यांनी सांगितले की, महिलांनी आर्थिक सक्षम झाले पाहिजे. पैशांची बचत करून त्या पैशाने पैसा जमला पाहिजे. तसेच संसारातील वायफळ असा खर्च टाळायला पाहिजे. आलेला पैसा कसा सुरक्षित गुंतवता येईल यावर चर्चा केली पाहिजे व समाजातील महिलांनी सामूहिक अशी बचत करून उद्योग उभारला पाहिजे असे सांगितले.
अॅड. पौर्णिमा महाजन यांनी महिलांना महिलांचे कायदेविषयक अधिकार सांगून मार्गदर्शन केले. वैशाली महाजन अंकलेश्वर यांनी समाजातील पालकांनी आपल्या पाल्याविषयी कसे जागृत असावे व परिवाराशी नेहमीच सुसंवाद ठेवावा, कारण कम्युनिकेशन्स इज द की ऑफ सक्सेस असे सांगितले. सिनेट सदस्या अंबिका प्रदीप शेंडे यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे यावर महत्त्व पटवून सांगितले.
चोपडा महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या नरेश महाजन यांना मंडळातर्फे ‘सावित्रीची लेक २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेळाव्यात खानदेशातील प्रत्येक गावातील आलेल्या महिलांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या माजी सभापती चित्रा कैलास महाजन होत्या.
व्यासपीठावर सिनेट सदस्या अंबिका राहुल शेंडे तळोदा, खर्ची सरपंच आशा विठ्ठल महाजन, अंबापिंप्री सरपंच शुभांगी मनोहर महाजन, योगिता भरत महाजन, माजी लोकनियुक्त सरपंच जना माळी, जिल्हा बँक संचालिका प्रमिला प्रभाकर चव्हाण, अडावद येथील माजी लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, माऊली महिला मंडळ लासूरच्या अध्यक्षा डॉ. भावना राजेंद्र महाजन, उपाध्यक्षा देवकाबाई रतन महाजन, मुक्ता जगन्नाथ महाजन, अंकलेश्वर महिला मंडळ अध्यक्षा वैशाली मनोहर महाजन, लॉ ऑफिसर पौर्णिमा सचिन महाजन, रत्ना दंगल महाजन, मनीषा मधुकर महाजन उपस्थित होते. सूत्रसंचालन गायत्री शैलेश शेलकर (नाशिक) व कीर्ती मोहन महाजन (चोपडा) यांनी केले. मेळावा यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ तसेच लासूर येथील समाज बांधव व युवक मित्रांनी परिश्रम घेतले
अधिवेशनातील ठराव
प्री-वेडिंग शूटिंग बंद करणे.
हळद वेळेवर लावणे.
वैदिक पद्धतीने विवाह बंद करणे
लग्नकार्यातील मेहंदी फंक्शन बंद
करणे.