माणूस शेवटी माणूस!

कधी-कधी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर, निराशेची लाट मनावर अशी विध्वंस करते की, ती व्यक्ती आपले अनमोल आयुष्य स्वतःच्या हातून संपवून बसते. मग त्यात वर्गवारी, अशी काही म्हणता येणार नाही. कारण गरीब, श्रीमंत, तरुण, वृद्ध, महिला, पुरूष कोणत्याच वर्गातील लोक याला अपवाद नाही. कोणत्याही प्रकारचा ताण माणसास असह्य होऊ शकतो आणि तेव्हा पैसा, प्रसिद्धी, देव, पूजा-अर्चा कशाचाही उपयोग होत नाही, याची अनेक उदाहरणं आज आपल्याकडे आहेत.

कारण, काय तर त्या व्यक्तीची आशाच संपलेली असते. अत्यंत शुल्लक कारणांनी १२ ते १८ वयोगटातील मुलेदेखील थेट मृत्यूला कवटाळत आहेत. शुल्लक कारणांवरून आत्महत्या करून आयुष्य संपवून टाकण्याचा या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग, आज अनेक देशात चिंतेचा विषय बनला आहे. आज १० सप्टेंबर, ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिना’निमित्ताने याविषयीचे हे चिंतन आत्महत्यांना आळा घालण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर रोजी ’जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ आयोजित केला जातो. २००३ पासून या दिवसाची सुरुवात झाली. सध्या ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन’ द्वारे ७७ देशांत शाखा कार्यरत आहेत.

आत्महत्या हा प्रत्येक देशाच्या दृष्टीने चिंतेचा आणि सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न असल्याचं ‘जागतिक आरोग्य संघटने’चं म्हणणं आहे. या वर्षीची थीम आहे कृतीतून आशा निर्माण करणे. जगातल्या इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत जपानमध्ये आत्महत्यांसंबंधीचा अहवाल अधिक वेगाने आणि अचूकपणे नोंदवला जातो. जपानवर आजवर अनेक संकटं कोसळली आहेत. २००८ सालचं बँकिंग संकट, जपानचं स्टॉक मार्केट कोसळलं. त्यावेळचं संकट आणि गेल्या काही दशकांत लग्न न करता एकट्याने राहणार्‍या स्त्रियांचं वाढतं प्रमाण, अशी अनेक संकट जपानने झेलली. संकटांचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय पुरुषांना बसला. त्यामुळे पुरुषांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ दिसून आली होती,

तर दुसरीकडे हंगेरीतील एक संगीतकार रेजसो सेरेज यांनी १९३३ मध्ये ’सॅड संडे’ अथवा ’ग्लुमी संडे’ नावाचे एक गाणे तयार केले होते. असे म्हटले जाते की, हे गाणे प्रेमावर आधारित होते. हे गाणे हृदयाला ऐवढे भिडणारे होते की, ऐकणार्‍यालाही आपल्या वेदनांची आठवण यायची. त्यामुळे हे गाणे ऐकून अनेकांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जाते. या गाण्यावर तब्बल ६२ वर्षे बंदी घालण्यात आली होती. म्हणजेच काय आपण विचारही करू शकणार नाही, अशा घटना आपल्या आसपास घडत असतात. सर्वांना हसवणारा रॉबिन विल्यम्स नावाचा हॉलिवूडचा नायक असो किंवा सर्वांना रडवणारा, लाखो लोकांचा जीव घेणारा हिटलर, दोघेही आत्महत्येचे शिकारच ठरले. आपल्याकडेही अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यांचं अशा तर्‍हेने जाणं आपल्याला अचंबित करून जातं.

मग ती नुकतीच घडलेली सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या असो की, अवघ्या काही वर्षांपूर्वीची सुशांत सिंगची असो. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूतने नैराश्यातून आत्महत्या केली, असं म्हटलं जातं. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने दुपारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती, तर बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार कुशल पंजाबीने मुंबईमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी त्याने एक पत्र लिहिलं होतं, यात त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. प्रत्युषा बॅनर्जीनं २०१६ साली आत्महत्या केली होती. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले होतं. जिया खानने २०१३ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अशा अनेक घटना सिनेसृष्टीतल्या सांगता येतील. पण, इतर क्षेत्रातही तेच.

सामाजिक कार्य करणार्‍या घराण्यातील शीतल (आमटे) करजगी यांची आत्महत्या अनेक प्रश्न उभे करून गेली, तर आध्यात्मिक गुरू अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात, ही आश्चर्यकारक गोष्टच नाही का? उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून केलेली आत्महत्या असो किंवा ‘मनशक्ती’ नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरून उडी मारुन जीव देतात, असं ऐकण्यात येतं. तेव्हा सामान्य आणि असामान्य यात फरक कोणता असेच नाही का वाटत? शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विषय आपल्या राजकीय, सामाजिक पटलावर अधूनमधून चर्चेत येतच असतो. सरकारे बदलली की, हा मुद्दा काही काळापुरता पुन्हा तीव्रतेने केंद्रस्थानी येतो.

आश्वासनपूर्तीची औपचारिकता पार पाडली जाते. अर्थव्यवस्था कृषी आधारित असतानाही शेतीतून भांडवल निर्मितीला चालना देण्यापेक्षा उद्योगांना पूरक ठरणारी अर्थनीती अवलंबल्याने, शेतकर्‍यांवर वाईट वेळ ओढवते. कष्टाने शेती कसत असताना येणार्‍या नैसर्गिक आपत्ती व व्यक्तिशः संकटापुढे हार मानत तसेच शेतकरी पिकाची नासाडी होणे, अतिवृष्टी, वादळ, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्यांमुळे होत असलेलं नुकसान, याचमुळे बँकेचे कर्ज भरता न येणे, सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न होणे, अशा अनेक कारणांनी टोकाचं पाऊल उचलतात. हा प्रश्न वेगळा मांडला, तर शेती-शेतकरी यांच्या दुरवस्थेकडे राष्ट्रीय संकट म्हणूनच बघण्याची गरज आहे.आधीच गर्दीत हरवत चाललेल्या नातेसंबंधात ज्या उरल्या सुरल्या संवेदना होत्या.

त्या ‘कोविड’ महामारीत पार गोठून गेल्या आणि तेव्हादेखील आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसून आले. आपण काय शिकायचं? एकंदर या सगळ्या आत्यहत्यांमागे कारण काय तर ताण. काही षड्यंत्राचा अपवाद सोडले, तर त्या प्रत्येकाकडे आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला ’आऊटलेट’ नसेल, असे म्हणता येईल. अनेक चर्चासत्रांतून मानसोपचारतज्ज्ञांकडून तरी तेच ऐकायला येतं. कारण, केवळ पैसे नाही किंवा नोकरी नाही, म्हणून आत्महत्या होतात असे नाही, तर सिनेसृष्टी किंवा इतरही मोठ्या क्षेत्रातील ज्याचे जवळ अमाप पैसा, सुखसोयी आहे, अशा व्यक्ती आत्महत्या करीत आहेत. ‘आऊटलेट’ नाही म्हणजेच काय तर कोणाकडे तरी बोलण्याची, आपले दुःख मांडण्याची आता परिस्थिती राहिली नाही का? जग जवळ येतंय; पण सुसंवाद हरवत चालला नाही आहे का?

मोबाईल, नोकरी, चढाओढ, व्यापात गुंतल्याने किंवा आपल्या मानसिक स्वास्थ्यास उपयुक्त नसलेले किंबहुना हानिकारक अवास्तव विषयांवर जोर दिल्याने, एकमेकांच्या भेटीतून सुटू शकणारे प्रश्न आज कोणीच कोणाला सांगत नसल्याने, असे घडत आहे, का? या सगळ्या उदाहरणातून काय शिकायचं आपण?पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरून शांत दिसत असलं, तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे, त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहीत असतात, नाही का! जसे वर सुंदर ताजमहाल असला, तरी खाली कबरच आहे. माणूस वर-वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असू शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करीत असतो. आत्महत्या या घटनेमागे स्ट्रेस, निराशा, अपयश, मृत्यूची भीती अशा अनेक नकारात्मक भावना असतात.

तरुण वयोगटात हिंसा, चढाओढ, परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, लैंगिक शोषण, सायबर बुलिंग आणि खर्‍या किंवा आभासी अपयशामुळे आलेली निराशा अशी अनेक कारणेदेखील असतात.जसं अतिपाऊस आला की, सगळीकडे पाणी का तुंबतं? कारण, ते पाणी जाण्याचे ‘आऊटलेट’ (मार्ग) आपण बंद केले. तसेच मनाचं आहे. त्यात अनेक गोष्टी साचलेल्या असतात, त्या तुंबण्यापेक्षा त्याला मार्ग मिळण्याची गरज असते. खरं तर ते ‘आऊटलेट’ म्हणजे कोण आपला परिवार आणि मित्र! पण, आताच्या जगात विश्वास ठेवू शकणारे मित्रमैत्रिणीच दुर्मीळ होत चाललेत. प्रत्येकजण ’मी भला माझं जग भलं’ एकतर या प्रवृत्तीने किंवा क्षणिक मजामस्ती करण्याच्या दृष्टीने आयुष्य जगताना दिसतात. मैत्री ही सोशल मीडियाच्या जाळ्यात किंवा आभासी दुनियेत अडकली आहे.

कोणापुढे आपले दुःख मांडले, तर आपण हास्याचा विषय बनू किंवा आपल्याबद्दल मागून काय बोलले जाईल, याचीच भीती जास्त असल्याने मोकळेपणाने होणारा संवाद आज हरवत चालला आहे. जिव्हाळा, आपुलकी, विश्वास, प्रेम हे सगळे शब्द जड होत चालले आहेत. ’अहं’पणा वाढत चालला आहे. इंटरनेटमुळे प्रत्येकजण ज्ञानी झाला आहे. पूर्वी दहा डोकी एकत्र भेटल्यावर मजामस्तीमध्ये जाणारा वेळ आता गहन विषयावर चर्चा आणि मग त्यावर होणारे रुसवेफुगवे यातच जातो. पूर्वी मजेत होणारी भांडणं म्हणा किंवा क्षणिक असणारे वाद आता ‘इगो’वर जातात. आपलेच विचार बरोबर ही मानसिकता बनत चालली आहे. मग सकारात्मकतेकडून आपण नाकारात्मकतेकडे जाऊ लागलो आहोत का, असा प्रश्न पडतो.पण, कधी-कधी अशा नकारात्मकतेचं शेवटचं पाऊल आत्महत्या असू शकतं, हे आपण विसरतो. कोणाकडे मांडू न शकलेली व्यथा नकारात्मकतेमध्ये बदलू शकते. ’

आत्महत्या’ या शब्दामागे नकार, अपयश अशा नकारात्मक भावभावना असल्याने त्याविषयी मोकळेपणाने बोललं जात नाही. आत्महत्येतील प्रत्येक मृत्यू ही शोकांतिका आहे. परंतु, संशोधन असे दर्शविते की, त्याचे दर अधिक समज आणि समर्थनाने कमी केले जाऊ शकतात. मग आपण काय करू शकतो? मोकळा संवाद करू शकतो. एक दुसर्‍यावर विश्वास ठेवणाचा ‘विश्वास’ निर्माण करू शकतो. आपण मैत्री ठरवून करू शकत नाही; पण टिकवू तर शकतो. मोकळेपणाने चर्चा केल्यामुळे आत्महत्याप्रवृत्त व्यक्तीलाही आपल्याला समजून घेणारं कुणी आहे, असा विश्वास निर्माण होतो. ज्या व्यक्ती टोकाचं पाऊल उचलतात, ते मनोरुग्ण नसतात. त्यांच्यामध्ये होणारे बदल आजूबाजूच्या व्यक्तीने, नातेवाईक, मित्रमंडळींनी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या गोष्टींना मस्करीत नेणं, चिडवणं किंवा दुर्लक्ष करणं, त्याचं गॉसिप मध्ये रूपांतर करणं या गोष्टी टाळल्या गेल्या, तरच आत्महत्येचे प्रमाण निदान कमी होईल.

आपल्यापैकी प्रत्येक जण एक मित्र, मैत्रिण, सहकारी, शिक्षक, पालक, नातेवाईक, शेजारी या नात्याने आत्महत्येसारखा गंभीर विषय आणि त्याचं समाजातलं प्रमाण कमी करण्यासाठी निश्चितच लहान मोठा वाटा उचलू शकतो. नुसता दिखावा टाळून एकमेकांना योग्य प्रकारे भावनिक आधार देणे आणि योग्य वेळ देत एकमेकांचे आधारस्थान होण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी त्याला समस्याग्रस्त व्यक्त व्हायला सांगू शकतो. व्यक्तीची समस्या समजून ती सर्वप्रथम मान्य करा. गॉसिपचा विषय बनवू नका. अनेकदा प्रत्येकाला आपलाच ’प्रॉब्लेम’ मोठा वाटत असतो. परंतु, कोणासाठी कोणती गोष्ट मोठी असू शकते, हे तुम्ही ठरवू नका. ही काही मोठी समस्या नाही. हा काय प्रॉब्लेम आहे का, असं म्हणून अस्वीकार करू नका. त्यांची भावना समजून घ्या. अनेकदा केवळ ऐकून घेतल्यानेदेखील समोरच्या व्यक्तीला आधार मिळतो. एखाद्याला मन मोकळं करण्यासाठी आपला खांदा नाही, तर निदान आपले कान तर नक्कीच देऊ शकतो! म्हणूनच कदाचित म्हणतात ना, ‘तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल, तर नोटा मोजू नका. कधी डोळ्यांत दोन अश्रू आले, तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.’संध्या सामंत-सावंत
(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)

संध्या सामंत-सावंत