तरुण भारत लाईव्ह न्युज : शहरातील विविध व्यापारी संकुलातील बेसमेंटच्या जागी पार्किंगऐवजी व्यावसायिक वापर करण्यात आला आहे. व्यापारी संकुलात बेसमेंटमध्ये वाहन पार्किंग ऐवजी सुरु असलेल्या व्यावसायिक वापरामुळे वाहनधारकांना संकुलात कामानिमित्त जातांना आपल्या ताब्यातील वाहने भररस्त्यावर उभी करावी लागतात. यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक ठप्प होते. शहर पोलिस वाहतुक शाखेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याची वेळ वाहनधारकांवर नेहमी येते. शहरात विविध व्यापारी संकुलातील पार्कींगच्या (बेसमेंट) जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामाला विरोध दर्शवण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी 2 वर्षापूर्वी मनपा आयुक्त कार्यालयाच्या दालनात एक दिवसीय उपोषण देखील केले होते.
मनपा आयुक्त कार्यालयाच्या दालनात सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान हे उपोषण केले होते. या उपोषणासाठी 4 ु 4 आकारमान असलेल्या जागेची शासकीय फी भरण्याची तयारी देखील दर्शवली होती. या खटाटोपानंतर 7 डिसेंबर, 2020 रोजी केलेल्या आदोलनाच्या दरम्यान मनपाकडून आश्वासन देण्यात आले होते की,आयुक्त यांचेशी झालेल्या चर्चान्वये जळगाव शहरातील बेसमेंट मधील अनधिकृत वापर झालेल्या जागांच्या उर्वरित प्रकरणांमध्ये नगररचना विभाग सर्व्हेक्षण करुन सुनावणीअंती सकारण आदेश पारित करेल. तद्वतच, पारित झालेल्या सकारण आदेशांबाबत आयुक्त, उपायुक्त (अतिक्रमण), सहायक संचालक, नगररचना, विधी सल्लागार जशमनपा यांचे सोबत पुढील आठवड्यात बैठक घेवून सर्व कायदेशिर बाबींचा विचार करुन धोरणनिश्चिती करण्यात येईल व तसे आपणास अवगत करण्यात येईल व लवकरात लवकर जळगाव शहरातील व्यापारी संकुलातील बेसमेंटच्या जागी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे ते आश्वासन होते. त्या आश्वासनावर विश्वास ठेवत उपोषण उठवले होते. मात्र या विश्वासाला मनपाने हवेतच उडवले.
कॅलेंडरच्या तारखा बदलत बदलत एक वर्षाचा कालावधी उलटला, मात्र बेसमेंटचा विषय काही मार्गी लागला नाही. मात्र मी आश्वासन काही विसरलो नाही. म्हणून आश्वासन देऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याने मनपाच्या लोकशाही दिनी 6 डिसेंबर,2021 रोजी निवेदन देऊन केक खाओ आंदोलन करत आश्वासनाचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आता दुसरा वाढदिवस त्यांनी साजरा केला.