मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची फाइल ‘पीएमओ’त अनिल गोटे यांची माहिती

धुळे : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, १६ हजार ३२० कोटी ५३ लाखांच्या आर्थिक तरतुदीसाठी ही फाइल अर्थमंत्रालय व पंतप्रधान कार्यालयात पोहचली असल्याची माहिती धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रेल्वे बोर्डाकडून आणि नियोजन आयोगाकडून रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे, असे गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कल्याण भवनातील लोकसंग्रामच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोटे म्हणाले, रेल्वेमार्गासाठी गेल्या ५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. २०२२-२३ मध्ये त्या रेल्वेमार्गाचा पिंक बुकमध्ये समावेश झाला.

१ ऑगस्ट २०२३ ते २० नोव्हेंबर २०२३ या काळात ५ बैठका झाल्या. त्यानंतर ६ डिसेंबर २०२३ रोजी रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. जोपर्यंत रेल्वे बोर्ड मंजुरी देत नाही, तोपर्यंत बोलू नका, असे वरिष्ठांनी सांगितल्याने आधी याबाबत वाच्यता केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सुलवाडे जामफळ प्रकल्पासाठी २ हजार ३७५ कोटी मंजूर करवून आणले आहेत. रेल्वेमार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचंड प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच हा रेल्वे मार्ग आकाराला येत असल्याचे गोटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला तत्कालीन नगराध्यक्षा हेमा गोटे, तेजस गोटे, विजय वाघ, प्रशांत भदाणे, डॉ. अनिल पाटील, मनोज मराठे आदी उपस्थित होते.