मुंबई : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण संदर्भात ‘निर्णय बैठक ‘ घेतली यात त्यांनी पुढील आरक्षण अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले यासोबतच त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सगेसोयऱ्याचे आरक्षण देऊ देत नाही. देवेंद्र फडणवीस यांचा मला संपवण्याचा डाव आहे. ते कोणाला मोठे होऊ देत नाही. असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.
मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर आरोप केल्यामुळे सरकारमधील अनेक नेते त्यांच्यावर टीका करत आहे, आमदार नितेश राणे यांनी सुद्धा जरांगे पाटलांना धारेवर धरले आहे. राणे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन नेमकं कशासाठी आहे. मराठा समाजासाठी आहे की फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आहे. जरांगे पाटील यांना या संपूर्ण प्रकरणाची स्क्रिप्ट नेमकी कुठून आली आहे. सगे सोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत सरकार कधी ना कधीतरी तोडगा काढेल? परंतु या निमित्ताने फडणवीस यांना टारगेट करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे सागर बंगल्याच्या बाहेर आम्ही देखील आहोत. त्या ठिकाणी आमची एक भिंत असेल. त्यामुळे त्याचा विचार जरांगे यांनी करावा. त्यांना पहिल्यांदा आमची भिंत पार करावी लागणार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे, ते म्हणाले की, ‘मनोज जरांगे काय बोलले मी ऐकलेच नाही. यामुळे मी कशा कशाला उत्तर देऊ.’