पारनेर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज पारनेर येथे मराठा संवाद सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. या सभेत जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा तोल सुटला. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर ऐकेरी भाषेत टीका केली. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गिरीश महाजन यांना उद्देशून जरांगे म्हणाले की, तो जामनेरचा म्हणतो माझे खूप लाड केले, काय लाड केले? फडवणीस साहेबाला मी सहा महिन्यांपासून बोललो नाही. काय करताल जेल मध्ये टाकताल, तर जेलमध्ये आंदोलन करेल, कैद्यांना आरक्षण समजूल सांगेल, असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच भुजबळ हिमालयात गेला काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
“सत्ताधारी आणि विरोधकांनी मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे. तुम्हाला मी मॅनेज होत नाही, आणि तुम्हाला गिनत नाही. त्यांचे एकच स्वप्न आहे याला बाजूला काढा. मुंबईमध्ये सर्व पक्षांनी ठराव केला होता 30 दिवसात आरक्षण देतो. आरक्षण विषय जवळ आला होता आणि हे मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले होते” असं मनोज जरांगे म्हणाले.
“देवेंद्र फडवणीस म्हणतात 10 टक्के आरक्षण दिले त्यामुळे मराठे खुश आहेत का? मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले आणि मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत. जो नोंदीला विरोध करत होता त्यांनी सर्वात आधी कुणबी प्रमाणपत्र काढले. आमच्या विरोधात कोणी गेले तर त्याचा सुफडा साफ करत असतो.
57 लाख नोंदी मिळाल्या, कशा आणि कोणी लपवून ठेवल्या?. त्याच वेळी नोंदी मिळाल्या असत्या, तर मराठा समाज आज प्रगत जात असती. 10 टक्के घ्यायला लावायचा डाव होता. विधानसभेच्या पटलावर तुम्ही सांगता मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे मग, 50 टक्क्यांच्या आत आणि ओबीसींच्या 27 टक्क्यांमधून का दिले नाही?” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.