खत आणि बियाण्यांचा काळाबाजार नेहमीचाच

तरुण भारत : ‘नेमेचि येतो मग पावसाळा’…कालचक्र हे सुरूच असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा त्यानंतर पुन्हा तेच ऋुतू…या कालचक्राप्रमाणे सुरू असतो व्यवहार आणि व्यवसाय. पावसाळा आला म्हणजे खरिपाची चाहुल लागते. पूर्वी एक दृश्य पहायला मिळायचे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी शेतकरी शेतात बियाणे टाकून देत…त्यानंतर पाऊस सुरू झाला की पंढरपूर वारीला रवाना होत. पाऊसही कसा सर्वत्र दमदार असायचा शेतकरी परतायचे त्यावेळी पिके बरीच वाढलेली असायची. मात्र आता काळ बदलला आहे. पाऊस मृगाच्या प्रारंभी येतच नाही. नंतर येतो तो कोठे धो-धो बरसतो तर कोठे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असतात. नंतरही बर्‍याच वेळेस पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडतच नाही आणि पडला तर उभी पिके वाहून जातात. हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. नुकसान झाले की शासकीय यंत्रणा पंचनामे करते शक्य तेवढी भरपाई देते. मात्र यातून झालेले नुकसान भरून निघणे अवघडच. खान्देशात बहुतांश शेती ही अद्यापही कोरडवाहू. पाऊस चांगला झाला तर ठिक नाही तर नुकसान जणू पाचवीला पुजलेले. काही वेळेस आणखी एक झटका बसतो तो म्हणजे यंत्रणांचा. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यातच शेतकर्‍यांच्या नुकसानीचा कहरच झाला. गत 15  दिवसांपासून शेतकर्‍यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

जामनेर, पाचोर्‍यासह विविध भागातील शेतकर्‍यांनी लागवड केली, मात्र हाती काहीही आले नाही. शेकडो शेतकर्‍यांना याचा फटका बसला. अखेर जामनेर तालुक्यात रासायनिक खत वापरल्याने शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीप्रकरणी  कृषी विभागाच्या पथकांने चौकशी करून धडक कारवाई केली. त्यात सरदार अ‍ॅग्रो. फर्टिलायझर अ‍ॅण्ड केमिकल कंपनीच्या तिघांसह बोगस खत विक्रीप्रकरणी 7 कृषी केंद्रचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सरदार रासायनिक कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकार्‍यांसह कृषी विभागाच्या पथकाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कृषी विभागाने या प्रकरणातील बोगस रासायनिक खतांचे प्रताप लक्षात आल्यानंतर 7 कृषी केंद्रचालकांवर  गुन्हा नोंदवून कारवाई केली. 14 जुलै रोजी जामनेर तालुक्यातील मोयखेडा, दिगर, तोरणाळा, देवळसगाव, वडगाव तिघे्र, तोंडापूर, तसेच सतर 12 गावातील शेतकर्‍यांनी सरदार अ‍ॅग्रो फर्टिलायझर अ‍ॅण्ड केमिकल कंपनी गुजतराचे सिंग सुपर फॉस्फेट झिंकेटेड, दाणेदार व पावडर या खताचा वापर केल्याने शेतकर्‍यांच्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात सुमारे 225 शेतकर्‍यांनी तालुका व जिल्हास्तरावर तक्रारी दिल्या होत्या. जिल्ह्यातील बर्‍याच बियाणे, खते विक्रेत्यांचे बोगस खत विक्रीत सहभागाचे रॅकेट या माध्यमातून उघड झाले. यात आता गुन्हा दाखल झाला असला तरी झालेले नुकसान भरून निघणार आहे काय? शेतकर्‍याचा एक हंगाम वाया गेला. नेहमीप्रमाणे भरपाई मिळाली तरी त्याच्या वर्षाचा संसार या भरपाईच्या रकमेत चालणार नाही, हे तेवढेच खरे. कधी खते तर कधी बियाणे यातील फसवणूक आता नेहमीचीच झाली आहे. या प्रश्नी जमेची बाजू म्हणजे

शेतकर्‍यांची बोगस बियाणे व खतामुळे होत असलेल्या फसवणुकीची दखल  राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. या अनुषंगाने 16 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीमध्ये जळगाव जिल्ह्यासह राज्यभरामध्ये बोगस बियाणे बोगस खतामुळे शेतकर्‍यांचे होणार्‍या नुकसानीसंदर्भात विषय उपस्थित झाला.  बोगस बियाणे व खत वाटप करणार्‍या कंपन्याविरुद्ध कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. याकरिता कृषीमंत्र्यांंच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. पावसाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर होणार असून यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक कृषी विभागाच्या यंत्रणांनीही याप्रश्नी सजग राहणे गरजेचे आहे. सरकारपेक्षा जनतेचे सेवक म्हणून मिरवून घेणारे अधिकारी वर्षाकाठी कोट्यवधीची वसूली करून गबर होतात. अधिकारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असते, होणार्‍या कायद्यातून दिलासादायक चित्र भविष्यात समोर येईल, अशी अपेक्षा करू या…!