जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष असा लाठी चार्ज केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. असेच पडसार जळगावातही उमटले. मराठा समाजातर्फे आज दुपारी 12 वाजता आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करून जालन्यातील घटनेचा निषेध नोंदवला.जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला. यात अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत.
यात महिला, युवक, मुली,वृध्दांवरही पोलिसांनी निर्दयीपणे लाठी चार्ज करून त्यांची डोके फोडलीत. हे चुकीचे आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्ष्ाणासाठी उपोषणास बसले आहे. त्यांची तब्येत खराब झाल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना उचलून नेत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.गेल्या दोन तीन दिवसांपासून आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा होत होता. त्यामुळे आजुबाजुच्या गावातील अनेक मराठा बांधव आंदोलनस्थळी जमा झाले. वाढती गर्दी लक्ष्ात घेत पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेत आंदोलनकर्त्यांवर अचानकपणे लाठीमार केला. यामुळे अनेक जण जखमी झालेत. या लाठी चार्जमध्ये महिला व लहान मुलांनाही पोलिसांनी सोडले नाही. या घटनेचा निषेध म्हणून मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा समाजाच्या नेत्या प्रतिभाताईपाटील, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील,प्रा. राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर,वाल्मिक पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
आ. रोहीत पवारांची भेट
दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेसचे आ. रोहित पवार यांनीही या आंदोलनात भाग घेत या घटनेचा निषेध नोंदवून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्ष्ाक शिल्पा पाटील, शहर वाहतूक शाखा व जिल्हा पेठ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
यावेळी आंदोलनकर्त्यांनी या घटनेला गृहमंत्र्यांना जबाबदार ठरवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून विविध घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुक दोन तास ठप्प होती.