Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर कायदा करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात जाहीर केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा काही दिवस लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे
राज्य सरकारच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला दिलेला शब्द पाळून सरकारने २४ डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करावं, नाहीतर मोठं आंदोलन करू असा, इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्री गिरीश महाजन आज अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. मराठा समाजाच्या मागण्या आणि सरकारने दिलेल्या आश्वासनावर यावर सरकारचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार आहेत.
२४ डिसेंबरच्या डेडलाईनपूर्वीच जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आजच्या चर्चेत जरांगे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार
राज्य सरकारने २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर रोजी घराघरातील मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार आहे. सरकार आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं वाटते, मुख्यमंत्र्यांनी निर्णय मोठा घेतला त्यांच्या धाडसाचे कौतुक असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे.