प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भिषण अपघात, एका मजुराचा मृत्यू

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भिषण अपघात झाल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. या घटनेत तिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झाला असून अभिनेत्री देखील गंभीर जखमी झाली आहे.

मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना तिच्या भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोघांना धडक दिली.

या अपघातात एका मजूराचा मृत्यू झालाय. तर, एकजण गंभीर जखमी असल्याचं समजतंय. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून. पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान कारमधील एअर बॅग वेळवर उघडल्याने उर्मिला या अपघातामधून बचावली. पण ती देखील या अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे तिचा चालकही या अपघातामध्ये गंभीर जखमी आहे. यामध्ये पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. तसेच यावर अभिनेत्री अथवा तिच्या कुटुंबातील कोणीही या घटनेवर भाष्य केलं नाही.

उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.