सिंगापूरमधील मरीअम्मन मंदिर

तरुण भारत लाईव्ह । प्रा.डॉ.अरुणा धाडे़ । “२०० वर्षे जुने ‘श्री मरीअम्मन मंदिर’ “महाकुंभाभिषेक” विधी नंतर रविवारी १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंगापूरच्या उपपंतप्रधानांच्या हस्ते पुन्हा दर्शनासाठी उघडण्यात आले. हिंदू धार्मिक रितीनुसार दर बारा वर्षांनी होणाऱ्या मंदिर ‘शुचिर्भूत शुद्धीकरण’ समारंभात 20,000 हून अधिक लोक सहभागी झाले” ही बातमी सहजच वाचनात आली आणि डोळ्यांसमोर बारा  वर्षांपूर्वी भेट दिलेले सिंगापूरचे हे अनोखे मंदिर उभे राहिले. लोकल टॅक्सी वाल्याने हिंदू मंदिरी जाण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती चायनाटाऊन मध्ये आणून सोडलं होतं. सिंगापूरच्या बहुतांश भारतीय असणाऱ्या ‘लिटिल इंडिया’ च्या ऐवजी ‘चायना टाउन’ मध्ये भारतीय प्राचीन मंदिर असणे, हा विरोधाभास खासच आवडला होता !

सिंगापूरला गेल्यावर ज्या मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात ते ‘श्री मरीअम्मन मंदिर’ हे निव्वळ पर्यटन आकर्षण नाहीये तर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे सिंगापूर गव्हर्नमेंटने त्याला ‘राष्ट्रीय धरोहर’ म्हणून राजमान्यता दिलेली आहे.

विविध गडद रंगांनी नटलेले द्रविडीयन शैलीतील हे मंदिर अतिशय सुंदर आहे.ह्या मंदिराचा इतिहास सिंगापूर इतकाच जुना आहे. इथे श्रीगणेश, शिव, पार्वती, कृष्ण, मुरुगन अशा बऱ्याच देवतांची जवळजवळ ३६ हुन अधिक मंदिरे आहेत पण सर्वात पहिले आणि प्रसिद्ध मंदिर म्हणून श्री मरीअम्मन मंदिर ओळखले जाते.

“ज्या ठिकाणी मंदिरे नाहीत अशा ठिकाणी राहू नका”असा  वाडवडिलांचा बोधक सल्ला गाठीशी बांधत, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करणारे भारतीय व्यापारी श्रीनारायण पिल्लई जेव्हा सिंगापूरला आले तेव्हा यांनी 1827 साली मरीअम्मन मंदिराची स्थापना केली. तेव्हाच्या तुलनेत आजचे मंदिर विशाल आहे. अनेक देवतांची मंदिरे आलीत तरी मुख्य देवस्थानातील देवता ही 1827 मध्ये स्थापित केलेली मूळ देवताच आहे.

दक्षिण भारतात मरीअम्मन देवी, पार्वती, दुर्गा, काली, रुक्मिणी, द्रौपदी, शीतला देवी अशा विविध रूपात पुजली जाते. त्यांच्या मातृसत्ताक पद्धतीनुसार मरिअम्मन त्यांची मातृदेवी आहे.  त्यात मरीचा अर्थ ‘पाऊस’ आणि अम्मान म्हणजे ‘आई’ असा होतो. त्या अर्थाने समृद्धी आणणारी आणि साथींच्या रोगांपासून रक्षण करणारी म्हणून सिंगापूरला आलेल्या प्रवासी  कामगारांनी श्रद्धेने मरीअम्मनचे मंदिर स्थापित केले.

इथल्या मंदिरात द्रौपदीचे पांचपांडवांसह सुंदर मंदिर आहे. उच्चासनास्थित भगवान श्रीकृष्ण आहेत. महाभारतात पाच पती लाभलेल्या द्रौपदीला आपलं सत्व सिद्ध करावं लागलं होत त्याच धर्तीवर ‘थिमिथी’ नावाचा ‘फायरवॉकिंग’ सोहळा दिवाळीच्या दरम्यान साजरा केला जातो.अशी मान्यता आहे कि अग्नीच्या धगधगत्या निखाऱ्यांवर अनवाणी चालत  द्रौपदीने आपली निर्दोषता सिद्ध  केली होती तशीच भाविक आपली श्रद्धा सिद्ध करतात.

इतिहास बघितला तर लक्षात येईल आपली मंदिरे  केवळ पूजापाठ करण्याचे श्रद्धास्थानच मात्र नाही तर त्यांनी वेळोवेळी सामाजिक कारणांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर महत्वाचे योगदानही केले आहे.  ब्रिटिश वसाहत असलेल्या सिंगापूरला येणाऱ्या अनेक स्थलांतरित भारतीय कामगारांना, काम आणि निवास मिळेपर्यंत ह्या मंदिरात आश्रय दिला जायचा. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जायची. याशिवाय या मंदिराला हिंदूविवाह करण्याची अधिकृत मान्यता प्राप्त होती. आजही मंदिरात पारंपारिक विवाह समारंभ आयोजित केले जातात.

सिंगापूर सोडताना मंदिराचा मानाचा ध्वजस्तंभ लांबूनच दिसत होता. सनातन धर्माची ओळख जपणारा ध्वज आकाशात मुक्तपणे फडफडत होता! शाश्वतने आश्वस्थ केलं होतं!