---Advertisement---
जळगाव : लग्नाच्या नावाखाली एका तरुणाची तब्बल अडीच लाखांत फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अर्थात लग्न केल्याचे नाटक करून लग्नाच्या बदल्यात अडीच लाख रुपये उकळून तोतया नवरीने अंगावरील दागिन्यांसह लग्नानंतर चौथ्या दिवशी पळ काढला. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या नवरीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीच लाखात लग्न ठरले, मंदिरात बांधली गाठ
मिळालेल्या माहितीनुसार, वाघळी येथील ३० वर्षीय तरुणाची तब्बल अडीच लाखांत फसवणूक झाली आहे. तरुणाच्या विवाहासाठी त्याचे कुटुंबीय मुलीच्या शोधात असताना, वाघळीतील एका महिलेशी त्यांची ओळख झाली. महिलेने एक गरीब कुटुंबातील मुलगी शोधून देते; पण त्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले.
तरुणाच्या कुटुंबाने पैसे देण्यास होकार दर्शविल्यानंतर त्या महिलेने तुमच्यासाठी अकोला येथे मुलगी बघितली आहे, तिच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे, असे सांगून अडीच लाखांची मागणी केली. तरुणासह त्याचे कुटुंबीय ४ जून २०२५ रोजी मुलगी पाहण्यासाठी आरती गोपाल (चौपाडे हरीपेठ, अकोला) येथे घरी गेले. सर्वांना आरती पसंत पडली. त्यानंतर विवाहाची बोलणीही करण्यात आली.
बहिणीची तब्येत बिघडल्याची बतावणी
वाघळीचा तरुण व अकोला येथील आरती चौपाडे यांचे वाघळी येथे कमळेश्वर मंदिरात लग्न लागले. मुलाच्या कुटुंबाने लग्न जुळवून देणाऱ्या महिलेला अडीच लाख रुपये दिले. लग्नानंतर तीन-चार दिवस आरती ही वाघळी येथे राहिली. चौथ्या दिवशी तिने आपल्या बहिणीची प्रकृती खराब झाल्याची थाप मारत माहेरी जायचे असल्याचे सांगितले.
तिला घेऊन नवरदेव मुलगा अकोला येथे आला. तेथून आरतीने त्याची नजर चुकवत धूम ठोकली. आरती दिसत नाही, म्हणून तरुणाने तिच्या बहिणीला विचारले असता ती कोठेतरी गेली आहे, तुम्ही तुमच्या गावी जा, असे सांगितल्यावर तरुण गावी परतला. बरेच दिवस होऊनही ती न आल्याने तरुणाचे कुटुंबीय अकोला येथे आरतीचा शोध घेण्यासाठी गेले असता तुम्ही आरतीला शोधण्यास आला तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.









