कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न, बहिणीच्या नवर्‍यावर झाडल्या गोळ्या

यवतमाळ : कुटूंबाच्या इच्छेविरोधात जावून लग्न करणार्‍या बहिणीच्या नवर्‍यावर दोन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बहिणीचा नवरा गंभीर जखमी झाला असून आरोपीला अन्य नागरिकांनी पकडून चोप दिल्याने तोही जखमी झाला आहे. या प्रकणी आरोपीवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यात घडल्याचे कळते.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील आरोपी विकी भांगे याच्या बहिणीने दोन वर्षापूर्वी निलेश पवार या तरुणाबरोबर कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केले होते. मुंबईत वाहन चालक म्हणून काम करणारा निलेशचा सुखी संसार सुरू होता. मात्र कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध झालेल्या या लग्नामुळे विकी भांगे याच्या मनात निलेश पवार याच्या विषयी राग होता.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी शिर्डीजवळील सावळीविहीर येथे आरोपी विकीने गावठी कट्ट्यातून मेहुणा निलेश पवार याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या निलेशच्या खांद्याला लागल्या. यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना विकीला नागरिकांनी पकडून चांगला चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी गोळीबारात जखमी झालेला निलेश पवार व नागरिकांच्या मारहाणीत किरकोळ जखमी झालेला आरोपी विकी भांगे या दोघांनाही उपचारासाठी साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल केले.

आरोपी विकी भांगे याच्या विरोधात पोलीसांनी भादंवि कलम 307, 325, 727, आर्म अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडील गावठी कट्टा जप्त केला आहे. पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पुढील तपास करत आहेत.