बीड । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेकांनी बीड जिल्ह्यातील वाढत्या बंदुकशाही, खंडणी, दहशतवाद, आणि राजकीय गुन्हेगारीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कलेक्टरचं गायब झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
वाल्मिक कराड याला अटक न झाल्याने लोकांमध्ये अस्वस्थता होती, तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवरही अनेकांनी सवाल उपस्थित केले. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने विशेष लक्ष वेधले.
जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट
आव्हाड यांनी भाषणात एका “पोक्षे” नावाच्या अधिकाऱ्याचा संदर्भ दिला आणि त्यांच्या मुलाखतीतील अधिकाऱ्याने दिलेली माहिती सांगितली. बीडमध्ये असताना तिथे नेहमी मारामारी व्हायची. दर दोन दिवसाने मारामारी होत होती. पण एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरं काय माहीत नाही. पण या अधिकार्याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर येऊ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.
राजकीय वातावरण तापले
या मोर्चामुळे बीड आणि संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास, गुन्हेगारी प्रवृत्तींचा वाढता प्रभाव, आणि राजकीय हस्तक्षेप यावर सरकारकडून ठोस पाऊल उचलले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.