तरुण भारत लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील समता नगरातील २२ वर्षीय विवाहितेचा प्रसूतीनंतर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी घडली. विवाहितेचा मृत्यू जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मृत विवाहितेचे कुटुंब, नातेवाइकांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुुरुवारी गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले.
आरती विकास गवळी (वय २२, रा. समतानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत्यूचे ठोस कारण शेाधण्यासाठी विवाहितेचा मृतदेह धुळे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला आहे.
शहरातील समता नगरातील आरती गवळी यांना शनिवार, दि. १० डिसेंबरला दुपारी ४ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिकाऊ डॉक्टरांनी सीझरद्वारे महिलेची प्रसूती केली. रात्रीच आरती यांचा रक्तदाब कमी होवून प्रकृती चिंताजनक झाली होती. ही माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना देऊन आरती यांना खाजगीमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.
प्राणज्योत मालवली
मात्र, आरती यांना सोपविण्यास डॉक्टरांनी तब्बल तीन ते चार तासांचा विलंब केला. त्यामुळे महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. मध्यरात्री १ वाजता महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. गुरूवारी सकाळी आरती गवळी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.
गुरुवारी, २२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आरती हिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणून शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसेच महिलेचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन व्हावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त नातेवाईकांनी जन्मलेल्या बाळाला मांडीवर घेत आंदोलन केले.
मृतदेह धुळ्याला रवाना
आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन झाले. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो असे आश्वासन दिले. धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. नंतर मृतदेह धुळ्याकडे रवाना करण्यात आला.