मेहेरगाव खून प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर, सतत पैसे मागत असल्याने आईनेच..

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील ३८ वर्षीय तरुण पार्टीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेला होता, मात्र त्याचा दुसऱ्या दिवशी गावातील एका परिसरात मृत्यूदेह आढळून आला होता. दरम्यान, याबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतत आई-वडील आणि पत्नीशी भांडण आणि दारूसाठी पैसे मागत असल्यामुळे कंटाळलेल्या आईनेच मदयपी मुलाची 25 हजारात सुपारी दिली. तर तिघांनी त्या तरुणाचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे.

अमोल विश्‍वास भामरे (वय ३८) या तरुणाचा मृतदेह दि.१ रोजी नवलाणे गावच्या शिवारातील इंग्लीश मेडियच्या स्कूलच्या आवारात आढळून आला होता.त्याच्या मानेवर दोरीने गळफास दिल्याचे वळ होते. त्यामुळे अमोलचा खून झाल्याची फिर्याद त्याचे वडील विश्‍वास दामू भामरे यांनी सोनगीर पोलिसात दिली होती.  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हा शाखेकडून सुरु होता. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी वेगवान तपास सुरू केला.

अमोलच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढली. अवघ्या काही तासात पुंडलिक गिरधर भामरे रा.मेहेरगाव याला ताब्यात घेतले. त्यानेच त्याच्या दोन साथीदारांसह अमोलचा खून केल्याचा संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली, त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दरम्यान, अमोलच्या खुनाच्या बदल्यात आई लताबाईने पुंडलिक भामरेला २५ हजार रुपये देण्याचे कबुलही केले. त्यामुळे पुंडलिक भामरेने त्याच्या दोन साथीदारांसह अमोलचा गळा आवरुन खून केला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लताबाई भामरे हिला ताब्यात घेतले. तिने देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघां आरोपींना पुढील कारवाईसाठी सोनगीर पोलिसांमध्ये हजर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून गुन्ह्यातील दोघं फरार आरोपींचा शोध सुरु आहे.