तरुण भारत न्युज : रेल्वे प्रशासनने पॅसेजर गाड्या रद्द करून त्याऐवजी मेमू गाड्या भुसावळ विभागात सुरू केल्या होत्या. मात्र मूळात मेमू डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मेमू गाड्यांना सातत्याने डबे वाढवण्याबाबत मागणी केली जात असतानाच रेल्वे प्रशासनाने आता गैरसोय टाळण्यासाठी मेमू गाड्यांना आठ ऐवजी १२ डबे जोडण्याचा निर्णय १ जुलैपासून घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांना आता उभे राहून ऐवजी बसून प्रवास करता येणार आहे.
गाड्यांना वाढले जादा डबे रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, चाळीसगाव-धुळे मेमूला पूर्वी सात डबे होते. मात्र ती आता आठ डबे घेवून १ जुलैपासून धावणार आहे.
भुसावळ देवळाली ही संध्याकाळी सुटणारी आठ डब्यांची मेमू गाडी आता १० जुलैपासून १२ डबे घेऊन धावेत तर देवळाली-भुसावळ या मेमूला ११ जुलैपासून १२ डबे जोडण्यात येतील. भुसावळ-वर्धा मेमूला देखील आठऐवजी आता १२ डबे जोडण्यात येतील. ती ११ जुलैपासून धावणार आहे. वर्धा-भुसावळ मेनू ही गाडी १२ जुलैपासून १२ डब्यांसह धावेल. तसेच वर्धा बल्लारशाह ही मेमू गाडी १२ जुलैपासून १२ डबे घेऊन चालेल. बल्लारशाह वर्धा मेमू ही गाडी १२ जुलैपासून १२ डबे घेवून धावणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.