Mumbai hit and run case : पोलिसांना मिळालं मोठं यश, ठाण्यातून मिहीर शहाला केली अटक

मुंबई : मायानगरीत उघडकीस आलेल्या वरळी BMW हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शहा याला अटक केली आहे. मिहीरला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मिहीर शाहसह त्याची आई आणि दोन बहिणींसह इतर अनेक नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नातेवाईकांनी मिहीर शाहला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

ही घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. वरळी परिसरात भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने स्कूटरवरून जात असलेल्या पती-पत्नीला चिरडले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा व्यक्तीही गंभीर जखमी झाला. आरोपी मिहीर शहा रस्त्यावर वेगाचे तांडव करून फरार झाला. २४ वर्षीय मिहीर हा मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे.

मिहिरचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, ते घटनेपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये मिहीर रविवारी सकाळी एका बारबाहेर काही मित्रांसोबत त्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये बसलेला दिसत आहे. काही वेळाने त्याने स्कूटरला धडक दिली.