दुध संघ अपहार प्रकरणी अकोल्यातून रेकॉर्ड जप्त !

जळगाव ः जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणाच्या चौकशीला जळगाव पोलिसांनी जोरदार गती दिली आहे. अखाद्य तूपापासून चॉकलेट तयार करणारा संशयित आरोपी रवी अग्रवाल याला घेऊन गुरुवारी जळगाव पोलिसांचे पथक अकोल्यात गेले होते. याठिकाणी त्यांना तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन व्यवहार संबंधीचे रेकॉर्ड मिळाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

एवढेच नव्हे तर, लेबल फाडून तुपाची विक्री केली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. जिल्हा दूध संघातील 1800 किलो बी ग्रेड तुपाची कमी दरात विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलीस तपासात संशयित आरोपी रवि अग्रवाल हे कैलादेवी कुटीर उद्योग नावाने राजेमलाई चॉकलेटचा व्यवसाय करत होते. ते विठ्ठल रुख्मीणी एजन्सीकडून बी ग्रेड तुप खरेदी करत होते. बी ग्रेडचा वापर (मानवी वापरास निषिद्ध) असल्याचे त्यांना ते माहीत असूनही त्यांनी ते खरेदी केले. तसेच त्याचा राजेमलाई चॉकलेट बनविण्यासाठी वापर केला. संशयित आरोपी मनोज लिमये, हरी पाटील आणि रवि अग्रवाल यांना देखील याबाबतची कल्पना होती. तरी देखील त्यांनी त्याचा वापर करून लहान मुले व लोकांचे जिवन देखील धोक्यात आणले. त्यामुळे पोलिसांनी रवि अग्रवाला सोबत घेत थेट अकोला गाठले. त्याच्या कंपनीच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत तब्बल साडेचार हजार किलो तुपाचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेले कागदपत्र सापडली.

या प्रकरणात आतापर्यंत निखिल नेहते, मनोज लिमये, हरि पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, सी.एम.पाटील, रवी अग्रवाल यांना अटक झाली आहे. रवी अग्रवाल याला अकोल्यातून अटक झाली होती. तो बी ग्रेड तुपाचा चॉकलेटमध्ये वापर करित असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.