जळगाव : जिल्ह्याचे पर्जन्यमान ६३८.३३ मि.मी. असून आतापर्यंत सरासरी ५२३.१२ मि.मी. नुसार २१७.५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन तीन दिवर्सापासून विशेषतः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून प्रकल्प पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
खानदेशात विशेषता जळगाव जिल्ह्यातच नव्हेतर उत्तर महाराष्ट्रात पावसाने आठ दहा दिवसापासून दडी मारली होती. शिवाय आर्द्रता देखील कमी झाल्याने उष्णतेत वाढ होवून त्याचा खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत होते. परंतु दोन तीन दिवसांपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून काही ठिकाणी
कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. गिरणा नदी व प्रकल्प पाणलोट तसेच नदी उगम क्षेत्रातील सटाणा कळवण बागलाण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ९० मि.मी पावसाची नोंद झाली असून गिरणा प्रकल्पात ६.२५ दलघमी अर्थात ०.२२ टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे प्रकल्पात उपयुक्त साठा जलपातळी ४८ टक्क्यांपर्यंत पोचली असून लवकरच पन्नास टक्क्यांवर पोचण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक जलसाठवण क्षमता असलेल्या गिरणा प्रकल्पावर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा नगरपालिका, तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका, नांदगाव नगरपालिका तसेच सुमारे १५० ते १८० ग्रामीण पेयजल योजनांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. तसेच पन्नाशीच्यावर साठा झाल्यास गाठल्यास गिरणा पट्ट्याच्या रब्बीच्या ही आशा पल्लवित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आज गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला.
गिरणा धरणाची जलसाठवण क्षमता ५२३.५५ दलघमी अर्थात १८.४८७ टिएमसी (२१ हजार ५०० दलघफू) असून त्यापैकी तीन हजार दलघफू इतका मृतसाठा आहे. चणकापूर, पुनद, आरम, हरणबारी आदी उपनद्या व प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गिरणा नदी सध्या बऱ्यापैकी प्रवाहीत झाली आहे. त्यामुळे प्रकल्प जलपातळीत टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी प्रकल्पात ११.१८ टक्के जलसाठा शिल्लक होता.
गिरणा नदीवरील चणकापूर प्रकल्पात ८७.५१, उपनदी पुनदच्या अर्जुनसागर प्रकल्पात ६४.०४, हरणबारी ९७.०३, केळझर १०० टक्के तर माणिकपूंज ४८.४१ असा एकूण ७५.५५ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यात चणकापूर ४०९, अर्जुनसागर ४६०, ठेंगोडा २०१७, हरणबारी ४००, केळझर १९८ असा ३हजार ४७६ क्यूसेक विसर्गातून होत असलेल्या आवकेमुळे सौम्य गतीने वाढ सुरू आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यात देखील समाधानकारक पाऊस असून अमरावती प्रकल्प वगळता पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद आदी प्रकल्प पूर्ण क्षमतेने तर अनेर ५२.२८, सोनवद २९.६७, अक्कलपाडा ९३.७२, वाडीशेवाडी ४९.९९, मुकटी २३.३६ असा एकूण ५२.४१ टक्के सरासरी उपयुक्त जलसाठ्याने बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.