मिनी मंत्रालयात कामांना आचारसंहितेचा ब्रेक 

रामदास माळी 

तरुण भारत  लाईव्ह न्युज जळगाव  – मिनी मंत्रालयात विविध कामांच्या वर्कऑर्डर आणि शिफारशींच्या कामांना वेग आला होता. मात्र याचदरम्यान शुक्रवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यात आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामांनाही आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या वर्कऑर्डरअभावी सर्वच कामे थांबणार
आहेत.

जि.प.चा सिंचन विभाग बंधार्‍यांची कामे पावसाळ्यात करणार काय?

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे कामकाज सध्या कासव गतीने सुरू आहे. सिंचन विभागाने मागील महिन्यात झालेल्या कामवाटप समितीच्या बैठकीत या विभागाचे एकही काम नव्हते. त्यामुळे या विभागाची कामे अजूनही प्रस्तावित केली गेली नसल्याचे दिसून येते. सिंचन विभागाला ही कामे पावसळ्यापूर्वीच करावी लागतात. त्यासाठी सिंचन विभागाची कामे आजस्थितीत टेंडर प्रक्रियेला यायला हवी होती. कारण सिंचन विभागाकडून बंधार्‍याची कामे होतात. ही कामे जूनपूर्वी म्हणजे पावसाळ्या अगोदरच करावी लागतात. त्यामुळे ही कामे करण्यासाठी सिंचन विभागाकडे अवघ्या पाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पाच महिन्यात कामांची टेंडर, वर्कऑर्डर प्रक्रिया राबविण्याचे सिंचन विभागापुढे मोठे आव्हान आहे. सिंचन विभाग हे आव्हान कसे पेलणार आणि कामे कशी पूर्ण करणार हाही प्रश्‍नच आहे. जि.प.च्या सिंचन विभागाचे विभाग प्रमुख पांडे यांची यासंदर्भातील कामांच्या प्रक्रियेबाबत आवश्यक त्या प्रमाणात गती दिसून येत नाही. परिणामी या विभागामार्फत होणार्‍या बंधार्‍याची कामे विलंबाने होणार आहेत. तसेच या विभागामार्फत अद्यापही टेंडर प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यातच आचारसंहिता लागल्याने ही प्रक्रिया पुन्हा लांबणार आहे. शेतकर्‍यांसाठी उपयुक्त सिंचनाच्या कामांना यंदा मुहूर्त लागेल काय? याबाबत सांगणेही कठीण झाले आहे. याकडे सीईओंनी लक्ष देण्याची गरज आहे.

पाणीयोजनांना आचारसंहितेचा फटका !

जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत १ हजार ४७८ पाणी योजनांच्या कामांची प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. मात्र यातील वर्कऑर्डर झालेल्या पाणी योजनांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र निविदा प्रक्रिया होऊन वर्कऑर्डर राहिलेल्या पाणी योजनांची प्रक्रिया मात्र थांबणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी योजनांना आचारसंहितेचा फटका बसणार आहे. आचारसंहितेनंतरच या कामांच्या वर्कऑर्डर होतील असे सांगण्यात येत आहे. त्यातच जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या २०० पाणी योजनांचे टेंडर दोन वेळा रिकॉल करूनही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने २०० कामांची प्रक्रिया यापूर्वीच खोळंबली आहे.

लसीकरणामुळे जिल्ह्यात लम्पी नियंत्रणात…

जिल्ह्यात नोव्हेंबर, महिन्यात लम्पीने कहर केला होता. मात्र डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातील लम्पी नियंत्रणात आला आहे. त्यामुळे लम्पी बाधित गुरांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जिल्ह्यात रावेर, यावल, जामनेर, मुक्ताईनगर तालुक्यात लम्पीने कहर केला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गुरांवरील लम्पीची साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाभरात गायवर्गीय गुरांसाठी प्रभावी लसीकरण मोहीम राबविली होती. परिणामी जिल्ह्यातील पाच ते सहा तालुके वगळता इतर तालुक्यातील गुरांवर लम्पीची फारशी बाधा झाली नाही. त्यामुळे निम्म्या जिल्ह्यातील तालुक्यातील गुरांना लम्पीची बाधा झाली नाही. पशुसंवर्धन विभागाने राबविलेल्या लसीकरणामुळे बहुतांश गुरांचा जीव वाचण्यास मदत झाली.

जि.प. प्रशासकांचे विद्यार्थी हिताचे पाऊल….

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रशासक तथा सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी उचलले पाऊल निश्‍चितच विद्यार्थी हिताचे आहे. या माध्यमातून जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांची अतिरिक्त विषयांची तयारी करून घेण्यात येणार आहेत. तसेच रिक्त जागेवरील शिक्षक नसल्याने संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जि.प.प्रशासक यांनी घेतलेल्या निर्णयांचे पालक वर्गांने स्वागत केले आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहू नये या हेतूने सीईओंनी हा विशेष उपक्रम हाती घेऊन त्यासाठी ३२ लाख ७५ हजाराची तरतूदही ठराव समितीच्या बैठकीत केली. संबधित प्राथमिक शिक्षण विभागाला यासंदर्भात तातडीने अमंलबजावणी करण्याचे आदेशही दिले. प्रशासक म्हणून सीईओंनी घेतलेला निर्णय जि.प.शाळेतील विद्याथ्यार्र्च्या हितासाठी शिक्षण विभागामार्फत इतिहासात पहिला असा प्रयोग राबविण्यात येत असल्याचे दिसून येते.