जळगाव : मिनी मंत्रालयातील प्रभारी राज संपणार

तरुण भारत  लाईव्ह । जळगाव : मिनीमंत्रालयात सध्या बहुतांश विभागात विभागप्रमुखाच्या जागा गेल्या दोन वर्षापासून अधिक काळ रिक्त होत्या. मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने जि.प.तील विविध पदावर अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी पद वर्षभरापेक्षा अधिक काळापासून रिक्त होते. त्याच्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणून डॉ.लांडे यांना पदभार देण्यात आला होता. त्याचप्रमाणे सिंचन आणि बांधकाम विभागातही प्रभारी राज संपुष्टात येणार आहे. या पदावरदेखील शासनाने अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून निवडणुका जाहीर होत नसल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे. प्रशासक राज असल्याने जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशिया कारभार पाहात आहेत.

आरोग्य विभागाची मदार वर्षंभरापासून प्रभारीवर

जिल्हा परिेषदेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची मदार गेल्या वर्षभरापासून प्रभारी अधिकार्‍यांच्या खांद्यावर होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार सेवानिवृत्त झाल्यानंतर याठिकाणी शासनाकडून अधिकारी देण्यात आला नाही. त्यामुळे प्रभारी अधिकार्‍यांनीच कामकाज पाहिले. डॉ.तुषार देशमुख यांनी वर्षभर प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून धुरा सांभाळली. त्यानंतर डॉ.देवराम लांडे यांनी प्रभारी कामकाज पाहिले. मात्र वर्षांनंतर शासनाने या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.सचिन भोयेकर यांना नियुक्ती दिली आहे. ते आज सोमवारी रुजू होणार आहेत. डॉ.भोयेकर हे हिंगोली जिल्हा परिषदेत अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीने त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला सध्या तरी पूर्ण वेळ विभाग प्रमुख मिळाला आहे. परिणामी या विभागातील कामांना वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या जि.प.च्या आरोग्य विभागाच्या संथ गतीने होणार्‍या कारभारामुळे अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. बांधकाम विभागालाही मिळाले विभागप्रमुख

बांधकाम विभागालाही मिळाले विभागप्रमुख 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातही बांधकाम अभियंता धिवरे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर पी.ए. पाटील यांची नियुक्ती प्रभारी बांधकाम अभियंता म्हणून करण्यात आली होती. 31 मे रोजी बांधकाम विभागाचे अभियंता धिवरे सेवानिवृत्त झाल्याने या जागेवर प्रभारी अभियंत्यांकडून कारभार सुरू होता. मात्र बांधकाम विभागात  कार्यकारी अभियंता म्हणून सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील आदिवासी विकास विभागात सहाय्यक म्हणून मुख्य अभियंता म्हणून ते काम पाहत होते. त्यामुळे या विभागातील प्रभारी राजला पूर्णविराम मिळाला आहे. परिणामी या विभागातील कामांस गती येणार आहे.

फाईल ट्रॅकिंग प्रणालीव्दारे सीईओंचा वॉच 

आरोग्य विभागात वैद्यकीय बिलाची फाईल मार्गी लावण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत संबंधित तक्रारदाराने जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागातील बहुतांश टेबलावर पैशांसाठी फाईल प्रलंबित राहत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह इतर विभागातही फाईल ट्रॅकींग सिस्टिम सीईओंनी सुरू केली आहे. त्यात कोणत्या विभागात कुणाच्या टेबलवर किती दिवस फाईल प्रलंबित आहेत? याबाबत माहिती मिळते. त्याअनुषंगाने सीईओंनी विविध विभागात दीर्घ काळ आपल्या टेबलावर फाईल प्रलंबित ठेवणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीसा काढण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे फाईल प्रलंबित राहिल्याने आणि ट्रॅकिंग प्रणालीत निदर्शनास आल्यास सीईओंनी कारवाईचे सत्र सुरू केल्याने आरोग्य विभागासह इतर विभागातही शिस्त लागेल, असे आशादायी चित्र आहे. परिणामी कामात कुचराई करणार्‍यांना यामुळे निश्चिंतच दणका बसणार आहे.