जळगाव : महिला बचत गट चळवळीला अधिक सक्षम करण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात असून, या उपक्रमांचा महिलांच्या सक्षमीकरणावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यातील उमेदच्या वतीने आयोजित मिनी सरस प्रदर्शन-2025 चे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हा क्रीडांगण (जी.एस. ग्राऊंड) येथे करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी बचत गट चळवळीला व्यापक स्वरूप देत 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्यात सुमारे 65 लाख महिला बचत गट कार्यरत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख मंत्री महाजन यांनी केला. या योजनांच्या माध्यमातून महिला केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही वस्तूंची निर्यात करत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीयकृत बँकांनी आतापर्यंत बचत गटांसाठी 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले असून, नियमित पुनर्भरण होत असल्याने बँकांचे एनपीए टाळले जात आहे. विभागीय सरस प्रदर्शनांमुळे बचत गटाच्या उलाढालीत मोठी वाढ झाली असून, विभागीय स्तरावर उलाढाल 22 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्याला खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जळगावकरांना 23 ते 27 जानेवारीदरम्यान प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावण्याचे आवाहन केले.
मंत्री महाजन आणि खा. स्मिता वाघ यांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन खरेदी केली. त्यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत जिल्हाधिकारी प्रसाद यांनाही सहभागी करून घेतले. स्टॉल धारक महिलांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
खा. स्मिता वाघ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना 2010 मध्ये सुरू केलेल्या मुक्ताई सरस प्रदर्शनाच्या यशस्वी वाटचालीचा उल्लेख केला. त्यांनी वस्तूंचे आकर्षक पॅकिंग आणि प्रभावी विपणनाचे महत्त्व विशद केले.
जळगावकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन मिळावे आणि महिलांच्या कष्टांचे चीज व्हावे, यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग सुकर होत असल्याचे प्रदर्शनातील वातावरणावरून स्पष्ट होते.