---Advertisement---
जिल्हा दूध संघाचे काम अतिशय उत्तम प्रकारे होत आहे. तसेच बाजारपेठेत विक्री जर चांगली झाली तर नफा सुध्दा चांगला होईल यात काही शंकाच नाही. पुढच्या बौठकीमध्ये संघाला नफा हा तीन पट झाली पाहिजेे. सध्याच्या पशुखाद्य कारखान्याला 48 वर्ष झाले असल्याने उत्पादक क्षमता व गुणवत्तेचा माल तयार करणे तारेवरची कसरत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान असलेला पशुखाद्य कारखाना उभारण्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. दरम्यान दूध उत्पादकांना 50 पैसे भावफरक मंजुर करण्यात आला.
जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची सन 2024-25 या वर्षाची 54 वी वार्षिक सर्व साधारण सभा कमल पॅरेडाईज येथे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी सभेला जलसंपदा मंत्री गिरिश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. अनिल भाईदास पाटील, संघाचे जेष्ठ संचालक मधूकर राणे, संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आ. अरूण पाटील आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे उपस्थित होते. सभेचे कामकाजास सुरुवात करण्यापूर्वी चेअरमन आमदार मंगेश चव्हाण व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. चेअरमन आमदार चव्हाण यांनी दूध संघाच्या कामगीरीची माहिती दिली. कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी सर्व विषयांचे वाचन केले. सर्व विषयांना सभागृहातील सभासदांनी मंजुरी दिली.
पशुखाद्याची विक्री थांबवा
पातोंडा सोसायटीचे प्रतिनिधी यांनी खाद्यामध्ये बारली हा विषारी घटक असल्याने जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे जिथे जिथे हा घटक पशुखाद्यामध्ये वापरला जातो त्याचा आढावा घेवून या पशुखाद्याची विक्री थांबविली पाहिजे असे सांगितले. यावर गिता चौधरी यांनी समर्थन केले. विकास पशुखाद्याचे न्युटीशियन्स व प्रोटीनयुक्त असे 3 प्रकारचे मातृ पोषण, हायएनजी शक्ती, बफेलो गोल्ड यांचे लाँचींग मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.सूत्रसंचालन नुतन रानडे, आर.डी. पाटील यांनी केले. तर आभार कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी मानले.
दूध संघाला 2.28 कोटींचा नफा
सन 2022-23 या अहवाल वर्षात संघाला 6.72 कोटी तोटा असल्यामुळे आपल्याला भाव फरक उत्पादकांना देता आला नाही त्यामुळे दूध उत्पादकांची नाराजी होती परंतू सन 2023-24 या आर्थिक वर्षात संघाला (तोटा वजा जावून) 2.51 कोटी नफा झाला आहे. सन 2024-25 यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सांडपाणी हाताळणी प्रकल्पाचे काम पुर्ण करण्यात आले. एवढा खर्च करून सुध्दा दूध संघ 2.28 कोटी इतका नफा झाला आहे. तसेच संघाचे संस्थापक चेअरमन स्व. जे. टी. महाजन यांच्या पुतळ्याच्या कामाचे भुमीपुजन सोहळा लवकरच करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच जेष्ठ सचिव सुभाष सोमवंशी, प्रकाश होले, अनिता पाटील यांना संघाने प्रथमच सन्मानित केले. वार्षिक सर्व साधारण सभेस जिल्हयातील जवळपास 487 संस्था प्रतिनिधी सभेला हजर होते.
---Advertisement---