---Advertisement---

ट्रकचा रॉड लागून मंत्री गिरीश महाजन जखमी

by team
---Advertisement---

जळगाव : वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन गुरुवारी (27 मार्च) आले. ते शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मिल्ट्रीच्या ट्रकमध्ये उडी मारून चढले. मात्र, ट्रकचा वरचा रॉड थेट मंत्री महाजन यांच्या डोक्याला लागला. यामुळे गिरीश महाजन यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे महाजनांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. या वेळी गिरीश महाजन यांना क्षणभर चक्कर आले. त्याच स्थितीत मंत्री महाजन यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले. मंत्री महाजन ट्रकवरून उतरले. डोक्याचे रक्त थांबत नसल्याने उपचारासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी, शेख अखलाक यांनी तातडीने रुग्णालयात नेले. डॉ. नीलेश पाटील यांनी रक्त थांबविण्यासाठी मलमपट्टी केली आणि इंजेक्शन दिले. डॉक्टरांनी मंत्री महाजन यांना औषधी दिली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना क्षणभर काहीच उमजत नव्हते. त्यांना चक्कर आल्यासारखे झाले. मात्र, न थांबता मंत्री महाजन त्याच स्थितीत शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पत्नीला आणि परिवाराला जाऊन भेटत कुटुंबियांचे सांत्वन केले.

काळजी करू नका. देशसेवा करीत असताना अर्जुन यांना वीरमरण आले. याचे दुःख आमच्या मनात आहे. मात्र, मी आणि राज्य सरकार बाविस्कर यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत, असे मंत्री महाजन यांनी ग्वाही दिली. जखमी अवस्थेतच मंत्री महाजन अंत्ययात्रेत तिरंगा सर्कलपर्यंत चालत गेले. तिथे त्यांनी हजारो वरणगावकरांच्या उपस्थितीत मानवंदना दिली. डॉ. नीलेश पाटील यांनी उपचारासाठी पुढे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, मंत्री महाजन यांनी तातडीने नाशिक येथे महत्त्वपूर्ण बैठक असल्याने मला जावे लागेल, असे सांगत जखमी अवस्थेतच ते तातडीने वाहनाने नाशिककडे रवाना झाले.

वरणगावचे वीर सुपुत्र शहीद अर्जुन बाविस्कर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वरणगाव (ता. भुसावळ) येथील वीर जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्यावर असताना सोमवारी (24 मार्च) हृदयविकाराने वीरमरण आले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (27 मार्च) वरणगाव येथील बाजार समितीच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान अर्जुन बाविस्कर हे भारतीय लष्करात 15 वर्षांपासून सेवा बजावत होते. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार एकनाथ खडसे यांनी भेट दिली. या वेळी सैनिकांकडून मानवंदना देऊन बाजार समितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करून, बंदुकीच्या फेरी झाडून शहीद अर्जुन बाविस्कर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment