जळगाव : म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 34 कोटी 52 लक्ष निधीस शासनाने मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्यमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे व सतत पाठपुरावा केला होता. पालकमंत्र्यांनी म्हसावद व परिसर वासियांची मागणी पूर्ण करून वचनपूर्ती केली असून सर्वसामान्य रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधेमुळे चांगल्या आरोग्य सेवा व सुसज्ज हॉस्पिटलची दुमजली इमारत होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
अश्या असतील सुविधा
30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीग्रुह, शस्त्रक्रिया ग्रुह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण (TB), न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्र द्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.
असे असेल ग्रामीण रुग्णालय
ग्रामीण रुगणालय बांधकाम G+1असून ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत 4901.59 चौ.मी. म्हणजे सुमारे 53 हजार चौरस फुट इतके क्षेत्रफळ असलेल्या जागेत उभारले जाणार आहे. तसेच डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी टाईप 1, टाईप-2, टाईप -3 व टाईप – 4 अशी एकूण 29 निवासस्थान बांधकाम हे 1896.96 चौ.मी म्हणजे 20 हजार चौरस फुट जागेत बांधण्यात येणार आहे. इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 6798. 55 चौ.मी. आहे. ग्रामीण रुगणालय व निवासस्थान बांधकामासाठी 34 कोटी 52 लक्ष इतका निधी लागणार असून यातून विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मलनिस्सारण, आग प्रतिबंधक, अंतर्गत रस्ते, फर्निचर, पारीकिंग, भू-विकास , लिफ्ट, वातानुकुलीत यंत्रणा, आदी कामासाठी तरतूद करण्यात आली आहे.
म्हसावद हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे गाव असून येथिल मुख्य रस्त्याच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आलेल्या ठिकाणी 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी रुपये 34 कोटी 52 लक्ष 14 हजार इतक्या रकमेच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. म्हसावद व परिसरातील एकही रुग्ण आरोग्याच्या सोयी सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी ग्रामीण रुग्णालय आवश्यक होते. आता अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून निवासस्थानासह हॉस्पिटलची सुसज्ज अशी मुख्य होणार असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच दिलेला शब्द पूर्ण केल्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करतो. लवकरच आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते या ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे.
-पालकमंत्री गुलाबराव पाटील