सिंधुदुर्ग : “वक्फ बोर्ड कायद्याच्या माध्यमातून आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी घणाघाती टीका मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनी वक्फ बोर्डाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल करत हिंदू समाजाला सतर्क राहण्याचे आवाहन केले.
नितेश राणे म्हणाले, “जिल्ह्यात वक्फ बोर्डाने 156 ठिकाणांवरील जमिनींवर दावा केला आहे. सुदैवाने देशात व राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे, अन्यथा महाविकास आघाडीच्या काळात या जमिनी त्वरित बोर्डाच्या ताब्यात गेल्या असत्या. ही हिंदू समाजाच्या अस्तित्वाला आव्हान देणारी बाब आहे. नागरिकांनी याबाबत सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे.”
वक्फ बोर्डाच्या कारवायांचा तपास करणार
“वक्फ बोर्डाने देवस्थानांच्या जागांवर दावा ठोकण्याची हिंमत दाखवली आहे. यामध्ये आणखी काही षडयंत्र आहे का, याचाही सखोल तपास केला जाईल,” असेही राणे म्हणाले. “आज देवस्थानांवर दावा आहे; उद्या हीच मंडळी तुमच्या राहत्या घरांवर दावा करतील,” असा इशारा देत त्यांनी हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले.
वक्फ बोर्डाची मुजोरी मोडू
“देशात रेल्वे आणि डिफेन्सनंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमिनी आहेत. त्यांची ही मुजोरी केंद्र सरकारच्या सुधारित तरतुदींमुळे संपुष्टात येईल,” असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. “आमचं केंद्र सरकार असेपर्यंत वक्फ बोर्डाला सिंधुदुर्गात एक इंचही जागा मिळणार नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
इस्लामिक आक्रमण सहन करणार नाही
“आज सिंधुदुर्गातील आंगणेवाडी, कुणकेश्वर, रामेश्वरसारख्या देवस्थानांवर दावा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हिंदुत्ववादी विचारसरणीच्या सरकारमुळे अशा दाव्यांना आम्ही कधीही थारा देणार नाही. कुठलेही इस्लामिक आक्रमण सहन केले जाणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
हिंदू समाजाला आवाहन
“सिंधुदुर्गातील हिंदू समाजाने वक्फ बोर्डाच्या या षडयंत्राचा प्रतिकार करावा,” असे आवाहन करत राणे यांनी प्रशासनालाही कडक कारवाईसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.