जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक : मंत्री रक्षा खडसे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

जळगाव: नियोजन भवनात शनिवार 4 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत मंत्री रक्षा खडसे यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. याप्रसंगी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ना. संजय सावकार, आ. राजू मामा भोळे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी श्री. अंकित, मनपा आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत केंद्रीय मंत्री खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे इंजिनियर विभाग तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या पोलीस निरीक्षकांच्या कामकाजावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.

रेल्वे विभागाच्या कामांची गती मंदावलेली असून, त्यांचा कॉर्डिनेशन आणि कामांच्या आढाव्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचे मंत्री खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच यामुळे अनेक महत्वाची कामे रखडली आहेत.  पिंपळगावातील शेतकऱ्यांचा रस्ता बंद करण्याच्या मुद्द्यावरही मंत्री खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी दिलेल्या सूचनांमध्ये रेल्वे विभागाने या समस्यांवर तातडीने लक्ष देऊन  या समस्यांचा लवकरात लवकर निराकरण करावे अन्यथा वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या जातील, असा इशारा खडसे यांनी यावेळी दिला.

राष्ट्रीय महामार्गाच्या पोलिस निरीक्षकांना आपल्या हद्दीची आणि कार्याची स्पष्टता नसल्यामुळे केंद्रीय मंत्री खडसे यांनी त्यांना आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले.

नामदार संजय सावकार यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोपांची बरसात करत सांगितले की, हे विभाग फक्त कलेक्शन करतात, मात्र कारवाई करत नाहीत.

मंत्री खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मनपा यांच्यात चांगल्या समन्वयाची आवश्यकता व्यक्त केली. आरओबीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. गिरणा पंपिंग रस्त्याच्या प्रलंबित कामाचे मुद्दे तसेच भुसावळच्या राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास आणि क्रॉसिंगसंबंधी कामे लांबणीवर पडली आहेत, असे खडसे म्हणाल्या.

यावेळी, भुसावळमध्ये अतिक्रमणाचे मुद्देही समोर आले. स्थानिक पोलिसांसह संबंधित विभागांवर कार्यवाही करण्याची खडसे यांनी सूचना दिली. तसेच, संजय सावकारे  यांनी रस्त्यांच्या दुरुस्ती आणि साफसफाईचे प्रश्न उपस्थित करत थेट टोल नाक्याची तोडफोड करण्याची धमकी  बैठकीत दिली.

बैठकीत इरिगेशन विभागाने त्यांच्याकडे निधी  नसल्याने कामात अडचणी येत असल्या तरी तांत्रिक अडचणी दूर झाल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री खडसे यांनी या बैठकीत प्रशासनातील सुधारणा आणि कार्यप्रणालीमध्ये गती आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.