मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित दुर्घटना ही मांडवा येथे घडली आहे.
मांडव्यात उदय सामंत यांची बोट जेटीत धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बोटीवरील सर्वजण सध्या सुखरुप असल्याची माहिती समोर येतेय. बोटीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला अशी चर्चा आहे.
छत्रपती संभाजीराजे आणि उदय सामंत हे सामंत गेट ऑफ इंडियावरुन मांडवा येथे अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनाच्या बैठकीसाठी जात होते. मांडवा जेट्टी जवळ पोहचल्यावर बोट जेटीवर लावण्यासाठी वळवली, यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. चालकाने बोटीवर निंयत्रण मिळवून बोट सुखरूप लावली.
या अपघातानंतर पालकमंत्री उदय सामंत हे मांडवा येथे रस्तेमार्गाने गेले. त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे देखील होते. या अपघातावर पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की ते मांडवा येथे जात होते. यावेळी सुरवातीला काय घडत आहे, याचा अंदाज आला नाही. मात्र जेव्हा बोट खांबाला जाऊन धडकली तेव्हा काहीतर भयंकर घडत असल्याचा अंदाज आला. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही.