नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रात भारताची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू आहे. संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संरक्षण उत्पादनांची आयात कमी करण्यासाठी, संरक्षण उत्पादन विभागाने ३४६ वस्तूंची पाचवी स्वदेशीकरण यादी (PIL) जारी केली आहे. या यादीमध्ये धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या लाइन रिप्लेसमेंट युनिट्स, सिस्टम्स, उप-प्रणाली, असेंब्ली, उप-असेंबली आणि संरक्षण उत्पादनांसाठी कच्चा माल समाविष्ट आहे. यापुढे सरकारी संरक्षण कंपन्या ही उत्पादने आयात करू शकणार नाहीत.
संरक्षण मंत्रालयाने २०२० मध्ये सृजन संरक्षण पोर्टल सुरू केले होते. स्वदेशीकरण यादीत समाविष्ट असलेल्या वस्तूंची खरेदी भारतीय उद्योगांकडून करणे, बंधनकारक असणार आहे. यामुळे १,०४८ कोटी रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय स्वदेशी खरेदीमुळे देशातील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक वाढून आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, बीईएमएल लिमिटेड, इंडिया ऑप्टेल लिमिटेड, माझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यासारख्या कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी, सरकारच्या संरक्षण उत्पादन विभागाने तयार केलेल्या या पाच याद्या लष्करी व्यवहार विभाग (DMA) द्वारे अधिसूचित केलेल्या ५०९ वस्तूंच्या पाच सकारात्मक स्वदेशीकरण याद्यांव्यतिरिक्त आहेत. या सूचींमध्ये सेन्सर्स, शस्त्रे आणि दारूगोळा यांचा समावेश आहे. जून २०२४ पर्यंत, डीपीएसयू आणि एसएचक्यूएस द्वारे संरक्षण उद्योगाला ३६,००० हून अधिक संरक्षण वस्तू देशातील उद्योगांकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत संरक्षण कंपन्यांना ७,५७२ कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.