---Advertisement---
नंदुरबार : नवापूर शहरातील घरफोडीच्या घटनेतील संशयित बालकास पोलिसांनी २४ तासांत अटक करून चोरलेला दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. नवापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
नवापूर शहरातील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या जयेश शंकर वसावे यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले दागीने, मोबाइल, घड्याळ असा एक लाख ५२ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
जयेश वसावे यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी नवापूर पोलिसांत वसावे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांनी तपासासाठी पथक तयार करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. यात एका मुलाच्या संशयित हालचाली टिपण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्याची ओळख पटवून त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन बालकाच्या घरी पथक गेले. बालक घरीच आढळल्याने चौकशी करण्यात आली असता त्याने चोरीची कबुली दिली. शिवाय चोरलेला एक लाख ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बालकास ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, हवालदार अमोल जाधव, दिनेशकुमार वसुले, दिनकर चव्हाण, दिनेश बाविस्कर, संजय गावीत, भारती आगळे यांच्या पथकाने केली.