भुसावळ ः कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात भाजपा महिला पदाधिकार्यांच्या कन्येसह अन्य मैत्रिणींचा टोळक्याने विनयभंग करीत मोबाईलमध्ये फोटो व व्हिडिओ काढल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी सात संशयीतांविरोधात रविवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली तर अन्य एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले होते. अटकेतील तिघांना भुसावळातील अतिरीक्त जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणात तीन संशयीत पसार असून त्यांना शोधण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहेत.
लोकप्रतिनिधींच्या मुलीची छेडखानी
सूत्रांच्या महितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी कोथळी गावातील यात्रोत्सवात भाजपा महिला लोकप्रतिनिधीची कन्या तिच्या अन्य मैत्रिणी पाळण्यात बसण्यासाठी गेल्यानंतर संशयीतांनी त्यांचा पाठलाग केला तसेच मोबाईलमध्ये फोटो काढून व्हिडिओ काढले. सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचार्याला संशयीतांनी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सुरूवातीला पाच संशयीतांविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला तर रविवारी 18 वर्षीय मुलीचा तसेच अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब
तीन आरोपींना अटक ः न्यायालयाने सुनावली कोठडी
विनयभंग व पोस्कोच्या गुन्ह्यात मुक्ताईनगर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील यांना अटक केली तर एक अल्पवयीनाला ताब्यात घेतले. अटकेतील तीन्ही संशयीतांना मुक्ताईनगर पोलिसांनी भुसावळातील विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून 5 मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर अल्पवयीनाला जळगाव बालन्याय मंडळापुढे हजर करण्यात आले.
गुन्ह्यातील संशयीत आरोपी शिंदे सेनेशी संबंधीत
मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केलेला अनिकेत भोई हा मुक्ताईनगरचे शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय उपजिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या आहे. त्याच्यावर आधीच चार गुन्हे दाखल आहेत. छेडखानी व पोस्को अंतर्गत संशयीत अनिकेत भोई, माजी नगरसेवक पियुष मोरे, अनुज पाटील, चेतन भोई, युवा शहर प्रमुख सचिन पालवे, किरण माळी व एक अल्पवयीन (सर्व रा.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात विनयभंग, पोस्को तसेच आय.टी.अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे.
गुन्हा गंभीर, कुणाच्या सांगण्यावरून घडला त्यासाठी पोलीस कोठडी महत्त्वाची
भुसावळ अतिरीक्त जिल्हा न्यायालयात तपासाधिकारी व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तीन्ही संशयीतांना बंदोबस्तात हजर केले. यावेळी तपासाधिकारी नागेश मोहिते तसेच सरकार पक्षातर्फे अॅड.संजय सोनवणे यांनी घडलेला गुन्हा अतिशय गंभीर असल्याचे सांगत संशयीतांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यासह संशयीतांची सायकलॉजीकल टेस्ट करण्यासाठी व संशयीतांनी हा गुन्हा कुणाच्या सांगण्यावरून तर केला नाही ना याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली तर संशयीत आरोपींतर्फे अॅड.मनीष सेवलानी व अॅड.चरणसिंग यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, पोस्को व शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीच पोलीस कर्मचार्याने संशयीताचा मोबाईल तपासला मात्र त्यात काहीही आढळले नाही त्यामुळे विचारपूस करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून तीन्ही संशयीतांना तीन दिवसांची अर्थात 5 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.