मिस्प्लेस

 

अगदी नेहमीच्याच वापरातली, रोज लागणारी एखादी वस्तू अचानकच सापडेनाशी होते आपल्याला. आपण सगळीकडे शोधतो, दहा वेळा ती वस्तू ज्या ठिकाणी ठेवलेली असते ती जागा उलथापालथ करून पाहतो, नजर भिरभिरत राहते सगळीकडे ती वस्तू शोधत आणि मग नंतर नंतर आपण हतबल होत जातो. स्वतःवरच चिडचिड त्रागा सगळं करून होतं पण वस्तू सापडत नाही. डोक्याला भरपूर ताण देऊन आठवून पाहतो पण शेवटी ती वस्तू इथेच होती इथवर येऊन पुन्हा शोधकार्य सुरू होते. बराच वेळ गेल्यानंतर आपल्याला खात्री पटते की, वस्तू काही आता सापडायची नाही. मग डोकं शांत झाल्यावर अचानकच लाईट पेटल्यासारखं आपल्यालाच आठवतं की आपणच ती वस्तू दुसर्‍या जागी या ना त्यानिमित्ताने नेऊन ठेवलेली असते. बघायला गेल्यास बरेचदा आपल्याबाबत घडणारा हा प्रसंग नात्यांच्या बाबतीत पण लागू होत असावा का? मैत्री, प्रेम किंवा इतर कुठलीही नाती जी आपण फारच गृहीत धरलेली असतात. ती अचानकच हरवल्यासारखी वाटायला लागतात. ज्याला हक्काने हाक मारावी, असा मित्र अपरिचितासारखा कमरेवर हात ठेवून आपल्या आयुष्यातल्या अडचणींकडे पाहतोय, असं वाटायला लागतं.

प्रियकर किंवा प्रेयसीच्या डोळ्यात अनोळख दाटून यायला लागते. भरलेल्या लोकांच्या घरातही एकटेपण अचानक आपल्यावर चाल करून येतं. त्या वस्तूबाबत जे घडलेलं असतं ना तेच इथे नात्यांबाबत घडलेलं असतं. आपणच अनाहूतपणे ही नाती मिसप्लेस करून ठेवलेली असतात किंवा त्या नात्यांकडून आपणच मिसप्लेस झालेले असतो. आपलाच मित्र आहे समजून घेईल म्हणून आपण आपल्या सख्ख्या मित्राशी कधीतरी अगदी परक्यासारखे वागलेले असतो. वाढदिवस विसरला गेलेला असतो, समोरच्याला गरज असतानाही करू करू म्हणून एखादा फोन फारच लांबत गेलेला असतो. प्रेमातला नाजूकपणा आपणच सवयीचा झालाय म्हणून कठोरपणे हाताळलेला असतो. घरातल्या घरात कशाला हवंय कुणासाठी काही स्पेशल करायला म्हणून आपण आपला वेळ राखून ठेवलेला नसतो. हे काय वय आहे का म्हणून करायच्या आणि बोलायच्या कितीतरी गोष्टी आपणच टाळत गेलेलो असतो, असं सगळं आपण करत नाही आहोत, ही जाणिव तेव्हाच प्रकर्षाने होते जेव्हा नाती मिसप्लेस झाल्यासारखी वाटायला लागतात. तिचं हसणं आता आधीसारखं राहिलेलं नाही, त्याचं भेटणं आता उत्कट वाटत नाही, ती सतत चिडचिडच करतेय, तो सतत रागातच बोलतोय… असं काय काय व्हायला लागलं असेल ना तेव्हा समजायचं काहीतरी मिसप्लेस झालेलं आहे आणि मग ही नाती पुन्हा जागच्या जागी आणायची असतील तर डोकं शांत करायचं. काय चुकलं ते आठवून पहायचं. एखादा लाईट पेटतोच आणि आपल्याला ती हरवलेली नाती पुन्हा सापडतात.ती सापडल्यानंतरची चेहर्यावर येणारी स्माईल वर्थ मिलियन असते. कारण वस्तूसारखंच नात्यांचंही हरवल्यानंतरचं गवसणं खूप खास असतं.

     योगिता पाटील                                                                                                                                                                                                                                               ९६०४९२४१५८