भारतीय वायुसेनेने केले ‘मिशन सफेद सागर’चे स्मरण

भारतीय हवाई दलाने रविवारी २५ वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धातील आपल्या अतुल्य शौर्याला उजाळा दिला. शत्रूविरुद्धच्या युद्धात लष्कराच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी त्यांनी हजारो लढाऊ मोहिमा आणि हेलिकॉप्टर्सचा वापर केला.

संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ हवाई दल १२ ते २६ जुलै दरम्यान हवाई दल स्टेशन सरसावा येथे ‘कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सव’ साजरा करीत आहे. १९९९ मध्ये जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर लढलेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानला धूळ चारली होती. एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी शनिवारी एअर फोर्स स्टेशन येथील युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रसेवेत प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हवाई योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमादरम्यान त्यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला. निवेदनात म्हटले की, या काळात एक नेत्रदीपक एअर शो आयोजित करण्यात आला होता, ज्यात आकाश गंगा टीम, जग्वार, एसयू-३० एमकेएल आणि राफ `ल लढाऊ विमाने सहभागी झाली होती. हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एमआय-१७ व्ही ५ हेलिकॉप्टरने ‘मिसिंग मॅन फॉर्मेशन’ उडवले. चित्ता, चिनूक या हेलिकॉप्टरनेही चित्तथरारक सादरीकरण केले.

यावेळी ‘एअर वॉरियर ड्रील टीम’ आणि एअर फोर्स बॅण्डनेही सादरीकरण केले. हा कार्यक्रम पाच हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. यात शाळकरी मुले, सहारनपूर भागातील स्थानिक रहिवासी, माजी सैनिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि रुरकी, डेहराडून आणि अंबाला येथील संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. १९९९च्या कारगिल युद्धात शूर हवाई योद्धांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अभिमानास्पद वारसा भारतीय हवाई दलाला आहे. लष्करी विमानचालनाच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड होता. कारगिल युद्ध (मिशन सफेद सागर) हे भारतीय वायुसेनेच्या १६ हजार फुटांपेक्षा जास्त उंच पहाडीवरील आव्हानांना तोंड देण्याच्या लष्करी क्षमतेचा पुरावा आहे.