यावल : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास प्रारंभ केला आहे. मात्र, भारतीय जनता पक्षात त्यांना प्रवेश देण्यात आलेला नाही.
आमदार एकनाथराव खडसे यांनी यावल शहरासह तालुक्यातील ८ ते ९ गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार केला. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी रक्षा खडसे यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. आमदार एकनाथ खडसे यांनी मागील महिन्यात भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करणार असल्याचे सुतोवाचन केले होते. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा राजीनामा देऊन १५ दिवसात दिल्लीत भाजप प्रवेश होईल असे आ. खडसे यांनी सांगितले होते. मात्र ही मुदत उलटली तरी भाजपाच्या केद्रीय नेतृत्वाने आ.खडसेंना जवळ केलेले नाही. आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असल्याने कोणत्याही पक्षाचा प्रचार करु शकतो असे आ.खडसेंनी मागील आठवड्यात स्पष्ट केले. माघारीचा मुहूर्तही टळून गेल्याने आता खडसेंनी भाजपाचा प्रचार सुरु केला आहे. रावेर मधून आ. खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपाच्या उमेदवार आहेत.