जळगाव : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमेवर पुर्नाड चेक नाक्यावर अधिकार्यांच्या पंटरांमार्फत अवैध वसुली केली जाते, असा आरोप करीत या अवैध वसुलीविरोधात माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या सहकार्यांसह आरटीओच्या पुर्नाड सीमा तपासणी नाक्यावर ठिय्या दिला.
दोन राज्यांच्या सीमा तपासणी नाक्यावर होणार्या अवैध टोळधाडीविरूद्ध यापूर्वीदेखील आ. खडसेंनी आवाज उठवला होता. पुर्नाड आरटीओ तपासणी नाक्यावरुन अवैध टोल वसुली केली जात असल्याचा आरोप केला जातो. मात्र ही टोलवसुली थांबवायची कशी आणि दाद मागणार कोणाकडे? असा प्रश्न आहे. अशातच राष्ट्रवादी नेते आ. एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी रात्री पुन्हा पुर्नाड चेकनाक्यावर टोलवसुलीविरोधात ठिय्या आंदोलन करत थेट आव्हान दिले आहे. अवैध टोलवसुली प्रकरणी कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोपही खडसेंनी यावेळी केला. यात तत्कालीन शिवसेनेचे परंतु राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आमदार म्हणून विजयी झालेले चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री तथा आ. खडसे यांच्या स्थानिक प्राबल्य वादाला आरटीओ चेकनाक्याची फोडणी मिळाली आहे.
पुर्नाड चेकपोस्टवर क्षमतेपेक्षा अधिक भार असलेल्या मालवाहतूक वाहनधारकांकडून सुमारे २५ ते ३५ हजारांपर्यंत तरी अवैध टोल वसूली केली जाते. यात कोणाचा तरी वरदहस्त, आशीर्वाद असल्याशिवाय अशी टोल वसुली होऊच शकत नसल्याचाही आरोप करीत त्यांनी संबधित कर्मचार्यांना जाब विचारला. तेथील चेकपोस्टवर असलेल्या बॅरीअरजवळ ठिय्या मांडून आ. खडसे यांनी आरटीओ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केला आहे.
या चेकनाक्यावरील वजनकाटेच काम करीत नसून ओव्हरलोड ट्रकचालकांकडून मनमानीपणे रकम वसूल केली जात असल्याचा आरोप करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आ. खडसे केली आहे.
दरम्यान, आ. खडसे त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुर्नाड चेकनाक्यावर येणार असल्याचे समजताच तेथील पंटरने जमा झालेल्या रकमेसह पोबारा केला असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.