भुसावळ विधानसभा : अपक्षांसह वंचित आघाडीमुळे निवडणुकीत आली रंगत
गणेश वाघ
भुसावळ । भुसावळ विधानसभेचा आखाडा ऐन हिवाळ्यात तापला असून भाजपाचे आमदार संजय सावकारे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात ताकदीनिशी उतरले आहेत. यंदा विधानसभेत ते विजयाचा चौकार निश्चितपणे मारतील व राज्यमंत्रीही होतील, असा विश्वास भाजपेयी व समर्थकांना आहे. पहिल्याच यादीत आमदार सावकारे यांना भाजपाने तिकीट जाहीर करीत त्यांच्यावर विश्वास दृढ केला तर दुसरीकडे भुसावळात हक्काची जागा राष्ट्रवादीने दोन वेळा आलेला पराभव पाहता काँग्रेसला सहज सोडली. आधी राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेल्या डॉ.राजेश मानवतकर यांच्या गळ्यात ऐनवेळी काँग्रेसने उमेदवारीची माळ टाकून त्यांना रिंगणात उतरवले आहे तर दुसरीकडे आंदोलनामुळे चर्चेत असलेले माजी नगरसेवक जगन सोनवणे यांना वंचितने उमेदवारी दिली तर अपक्षही आपले नशीब आजमावत आहेत.
आमदार सावकारे विजयाचा चौकार मारणार !
भुसावळचे आमदार संजय सावकारे हे आतापर्यंत तीन पंचवार्षिक निवडणुकीत भाग्यशाली आमदार ठरत आले आहेत. 2009 मध्ये मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते राष्ट्रवादीतून पहिल्यांदा आमदार झाले व नंतर भाजपात प्रवेश केल्यानंतर 2014 व 2019 मध्ये ते भाजपातून विजयी झाले व पुन्हा 2024 मध्ये ते भाजपाच्या तिकीटावरून निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. स्वच्छ चारित्र्य, शांत व संयमी व्यक्तीमत्व या स्वभाव वैशिष्ट्यासह भुसावळ मतदारसंघात गेल्या 15 वर्षात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर ते मतदारांना सामोरे जात आहेत. या वेळच्या निवडणुकीत आमदार सावकारे विजयाचा चौकार मारून राज्यात भाजपाची सत्ता आल्याय निश्चितपणे मंत्री होतील, असा विश्वास भाजपातील खंद्या समर्थकांना आहे.
स्थानिक संस्थांमध्ये भाजपाचा प्रभाव
भुसावळातील नगरपालिका असो की कृउबा, शेतकी संघ, कॉटन सेल, फ्रुट सेल सोसायटींमध्ये भाजपाचा सर्वत्र बोलबाला आहे शिवाय जिल्हा परिषदेच्या गटासह गणातही भाजपाचे वर्चस्व आहे. पहिल्याच यादीत आमदार सावकारे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर आमदारांनी ग्रामीण भागात प्रचार फेर्या पूर्ण केल्या. भुसावळ शहरात आता त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. स्थानिक व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारासाठी अहोरात्र झटत आहेत. केंद्रासह राज्यातील भाजपा सरकारच्या जनतेसाठी राबवण्यात येत असलेल्या विविधांगी योजनांचा प्रचार व प्रचार मतदारांपर्यंत पोहोचण्यात भाजपाची यंत्रणा यशस्वी झाली आहे. असे असलेतरी मतदार कुणाकडे वळतात हे 23 नोव्हेंबरच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
विद्यमान आमदारांची जमेची बाजू
भुसावळात सुसज्ज प्रांताधिकारी कार्यालय, अतिरीक्त सत्र न्यायालय, ट्रामा सेंटर, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे पोलीस उपअधीक्षक कार्यालय, भव्य तहसील व प्रांताधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शहराची जिल्हा निर्मितीकडे असलेली वाटचाल तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांनी टाकलेली कात, ग्रामीण भागात जलजीवन मिशन अंतर्गत जलकुंभांची उभारणी, शेतरस्त्यांचे मजबूत जाळे, अनेक गावांना पर्यटन स्थळाचा दर्जा, शहरातील मंजूर असलेली केंद्राची महत्वकांक्षी अमृत योजना, वरणगाव-तळवेल उपसा योजनेच्या बंदीस्त पाईपलाईन कामाला सुरूवात, कुर्हा उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी तसेच कंडारीसाठी जलजीवन योजना मंजूर झाल्याने तेथील सुटणारा पाणीप्रश्न आदी आमदारांच्या जमेच्या बाजू आहेत.
विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे
भुसावळात सातत्याने वाढत जाणारी गुन्हेगारी, रेल्वे अतिक्रमण धारकांना अद्यापही घरकुलाची प्रतीक्षा, बेरोजगारी व एमआयडीसीत अनेक वर्षानंतरही मोठा प्रकल्प नाही, ट्रामा सेंटर असलेतरी पुरेशा सोयी-सुविधा व मनुष्यबळाचा अभाव, शहराला लागून असलेल्या वाढीव वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव, तापीचा स्त्रोत असतानाही आठ दिवसाआड मिळणारे पाणी विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे ठरत आहेत.
राष्ट्रवादीने काँग्रेसला जागा सोडत टाकली गुगली
राष्ट्रवादीने गत दोन विधानसभेत आलेल्या पराभवानंतर यंदा ही जागा काँग्रेसला सोडत गुगली टाकली. राजकारणाचा कोणताही गंध नसलेल्या व नवखे उमेदवार असलेले डॉ.राजेश मानवतकर हे आधी राष्ट्रवादीकडून इच्छूक असल्याने त्यांनी तुतारी चिन्हाचा प्रचार करीत प्रचारपत्रकही वाटले मात्र ऐनवेळी काँग्रेसला जागा सुटल्यानंतर डॉ.राजेश मानवतकर यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर ऐनवेळी त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र त्यामुळे स्थानिक काँग्रेसचे निष्ठावंत नाराज झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा शहरात साधा नगरसेवकही निवडून आलेला नाही तर 1990 नंतर नीळकंठ फालक वगळता येथे आमदारही झालेला नाही.
काँग्रेसला मात्र विधानसभेत चित्र बदलण्याची आशा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ.मानवतकर यांच्या सौभाग्यवती डॉ.मधू मानवतकर यांनी अपक्ष असूनही आमदार सावकारेंविरोधात कडवी झूंज देत दुसर्या क्रमांकाची मते मिळवली होती त्यामुळे यंदा काँग्रेस पक्ष चिन्हावर चित्र बदलेल व डॉ.मानवतकर विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस पदाधिकार्यांना आहे.
माजी आमदार संतोष चौधरी मतदारसंघात दिसेनात !
भुसावळातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरी हे काँग्रेसच्या प्रचारापासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच खासदार प्रणिती शिंदेंच्या सभेलाही चौधरींनी पाठ फिरवून आपली नाराजी उघड केली आहे. माजी आमदार चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी हे रावेरात निवडणूक लढवत असल्याने चौधरी तेथील मैदानावर उतरले आहेत. काँग्रेस आता नाराजांचे डॅमेज कंट्रोल अखेरच्या आठ दिवसात कसे करते ? यावरही निवडणुकीची गणिते अवलंबून असल्याचे जाणकारांना वाटते.
वंचितसह अपक्षांमुळे निवडणुकीत रंगत
2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभूत झालेले जगन सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडीने यंदा उमेदवारी दिली आहे. विविध आंदोलन व प्रखर भाषणांच्या माध्यमातून सोनवणे हे शहराला परिचीत असून विविध सभांमधून त्यांनी आजी-माजी आमदारांवर निशाणा साधून प्रचार सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार स्वाती जंगलेदेखील सामाजिक मतांच्या जोरावर आपले नशीब आजमावत आहेत तर अन्य अपक्षांनी रिंगणात आहेत.