छत्रपती संभाजीनगर : महायुतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. गुढीपाडव्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते तन आणि मनानं तुमचे काम करतील. तुम्ही केवळ रसद पुरवा, अशी साद मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महायुतीला घातली आहे.
संभाजीनगरातील आयएमए हॉलमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, मनसेचे संपर्क नेते दिलीप धोत्रे, जिल्ह्याध्यक्ष सुमीत खांबेकर उपस्थित होते. यावेळी नांदगावकर यांनी निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मिळावा. पक्षप्रमुखांचे छायाचित्र प्रचार रॅलीत असावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मनसेचे कार्यकर्ते तन आणि मनानं तुमचं काम करतील. तुम्ही त्यांना धन द्या. रसद पुरवा, अशी मागणी नांदगावकरांनी मेळाव्याला उपस्थित असलेल्या महायुतीच्या नेत्यांकडे केली. याला प्रतिउत्तर देत मंत्री संदिपान भुमरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांना मानसन्मान देण्याची ग्वाही दिली.