Modi Yunus Meet in Thailand : बिमस्टेक परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्यावर आहेत. यावेळी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यासोबत त्यांची भेट झाली असून महत्त्वपूर्ण बैठकही झाल्याचे शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी निदर्शनास आले. यादरम्यान भारताने अनेक प्रमुख मुद्द्यांवर आपली चिंता व्यक्त केली असून बांगलादेशला प्राथमिकतेने आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. तसेच अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावरूनही मोदींनी युनुस सरकारची कानउघडणी केल्याचे कळतेय.
अशी माहिती आहे की, पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या विशेषत: हिंदू समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा मोहम्मद युनुस यांच्यासमोर उपस्थीत केला. बांगलादेश सरकारने अल्पसंख्याकांचे संरक्षण सुनिश्चित केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचे अत्याचार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली पाहिजेत यावरही त्यांनी भर दिला. त्याचबरोबर अनावश्यक वक्तव्ये टाळण्याचा सल्लाही दिल्याचे कळते आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी बैठकीबाबत सविस्तर माहिती देत पुढे म्हणाले, भारताने कायमच स्थिर, लोकशाही, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक बांगलादेशला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचार आणि भेदभावाच्या घटना गांभीर्याने घेतल्या व त्याबद्दल चिंता व्यक्त केली. याशिवाय पंतप्रधानांनी मोहम्मद युनूस यांना तणावपूर्ण परिस्थिती टाळण्याचा आणि संयम बाळगण्याचा सल्लाही दिला.
सीमा सुरक्षेवर चर्चा
बिमस्टेक परिषदेदरम्यान झालेल्या पंतप्रधान मोदी आणि मोहम्मद युनूस यांच्या बैठकीत भारत-बांगलादेश यांच्यातील सीमा सुरक्षेवरही चर्चा झाली. बांगलादेशच्या सीमेवर होणारी बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या गरजेवर पंतप्रधान मोदींनी भर दिला. सीमेपलीकडून होणारी बेकायदेशीर घुसखोरी थांबवणे हे दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचे ते म्हणाले. एक चांगला शेजारी या तत्त्वाचे पालन करून भारत बांगलादेशला सर्वतोपरी सहकार्य आणि पाठिंबा देत राहील. मात्र, बांगलादेशने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.